बजरंग दलाला शोभायात्रा काढण्यापासून रोखले
दवर्ली येथे तणावाची स्थिती
मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी) - बजरंग दलातर्फे वास्को येथे आयोजित मेळाव्याला जाण्यासाठी येथील मारुती मंदिरासमोर जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दवर्ली वसाहतीत शोभायात्रा काढण्यापासून जिल्हा प्रशासनाने अडवून नंतर पोलिस संरक्षणात वास्कोकडे रवाना करण्याचा प्रकार आज दुपारी घडला व त्यांतून त्या परिसरात आज काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे वास्कोला जाण्यासाठी भगव्या वेशांतील हे कार्यकर्ते दवर्ली येथील मारुती मंदिरासमोरील पटांगणात एकत्र येऊ लागताच ते दवर्ली गृहनिर्माण वसाहतीत शोभायात्रा काढणार असल्याच्या संशयाने कोणीतरी ते पोलिसांना कळविले. लगेच सशस्त्र पोलिसांना घेऊन एक बस तेथे दाखल झाली व त्यांनी मारुती मंदिरासमोरून रहिवासी वसाहतीकडे जाणारा मार्ग दोरखंड बांधून अडविला. उपजिल्हाधिकारी दीपक देसाई हेही तेथे दाखल झाले व त्यांनी दलाच्या नेत्यांशी बोलणी करून त्यांनी मिरवणुकीसाठी कायदेशीर परवानगी घेतलेली नसल्याने त्यांना येथे मिरवणूक वा शोभायात्राही काढता येणार नाही, असे बजावले व नंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना वास्कोकडे पाठविले.
मात्र या एकंदर घडामोडीत दवर्ली भागात तणावाची स्थिती निर्माण झाली ,ती उशिरापर्यंत तशीच होती. बजरंगदल कार्यकर्ते जरी वास्कोकडे गेले तरी दवर्ली येथे रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Monday, 18 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment