राज्यात राजकीय हालचालींना वेग
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- बाबूश यांची सुटका झाल्यानंतर राज्यात अचानक राजकीय हालचालींना वेग आला. आज सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांनी बाबूश यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून मिळालेली वागणूक व केलेली मारहाण याचा तीव्र निषेध केला.
आज रात्री उशिरा आरोग्यमंत्री विश्वजित राणे त्यांची पत्नी दीव्या राणे, कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस, वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा व पंचायतमंत्री बाबू आजगांवकर यांनी भेट घेतली. बाबूश यांना फसवण्यामागे राजकारण असल्याचे आता सिद्ध झाल्याचा ठाम विश्वास यांनी व्यक्त करून अधीक्षक नीरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. हे प्रकरण खपवून घेतल्यास उद्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला खेचून मारहाण करण्याची कृती पोलिसांकडून सुरूच राहील, असेही मत या लोकांनी व्यक्त केले. बाबूश यांनी थेट नार्वेकर यांच्यावर आरोप केल्याने पुन्हा एकदा सरकार संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री उशिरा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आजच दिल्लीहून परतलेले राज्यपाल एस. सी. जमीर यांची भेट घेतली. बाबूश यांच्या प्रकरणी त्यांनी श्री. जमीर यांच्याशी चर्चा केल्याची खबर आहे. बाबूश प्रकरणाचे पडसाद दिल्लीतही पसरले असून नीरज ठाकूर यांना गोव्यातून पाठवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बाबूश यांना कायद्याच्या कचाट्यात देण्यासाठी त्यांच्यावरील विविध प्रकरणांचा संदर्भ घेत भक्कम केस तयार करण्याचा डावही आखला जात असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू असल्याने येत्या दिवसांत या सर्व गोष्टी उचल खाण्याची शक्यता आहे.
Friday, 22 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment