सासष्टी मामलेदारांकडून
मुदत वाढीला "मान्यता'मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) - केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष खिळून असलेल्या सिने अभिनेता संजय दत्त व मान्यता यांच्या गोव्यात झालेल्या वादग्रस्त विवाह नोंदणी प्रकरणी दिलेल्या रहिवासी दाखल्यासंबंधी सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी मान्यता हिला आपणासमोर हजर होण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असून त्यानुसार या प्रकरणी ७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
मामलेदारांनी काल तिला जारी केलेल्या नोटिशीनुसार तिला आज सकाळी ११-३० वा. पर्यंत मामलेदार कार्यालयात उपस्थित व्हावयाचे होते , पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्याऐवजी त्यांच्यावतीने त्यांचे वकील मनोज देसाई हे मामलेदार कार्यालयात उपस्थित राहिले व त्यांनी नोटीस कालच मिळाली असल्याने उत्तर देण्यासाठी किमान दोन आठवड्यांची मुदत हवी असल्याची विनंती केली . त्यावर थोडावेळ युक्तिवाद झाल्यानंतर मामलेदार फळदेसाई यांनी ७ मार्चपर्यंत मुदत दिली. आता ७ मार्च रोजीच त्यावर सुनावणी होणार आहे.
मान्यताने खोटा पत्ता दाखवून रहिवासी दाखला मागितल्याचे हे प्रकरण उघडकीस आल्यावर मामलेदार कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या चौकशीत आढळून आले हेाते. तो दाखला मिळवून मडगाव येथील विवाह नोंदणी कार्यालयात संजय दत्त व मान्यताने विवाहासाठी प्रथम नोंदणी केली होती . ती देखील वादात सापडलेली असून ती एकंदर प्रक्रियाच आता रहित ठेवण्यात आलेली आहे.
आज मान्यता कोर्टात उपस्थित राहणार की नाही हे पाहण्यासाठी पत्रकार तसेच नागरिकांनी गर्दी केलेली होती. परंतु ती न आल्याने बराच वेळ थांबून नागरिक परतले. उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मान्यताचे वकील मनोज देसाई यांची भेट घेऊन मान्यता संबंधी विचारले असता त्यांनी कालच नोटीस मिळालेली आहे व उत्तर द्यायला वेळ पुरेसा नसल्यानेच मुदतवाढ मागितली आहे , मान्यता सध्या कामानिमित्त गोव्याबाहेर असल्याने ती आज हजर होऊ शकली नसल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात निलंबन कारवाई झालेला तलाठी प्रशांत कुंकळयेकर याच्यावर आरोपपत्र ठेवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुंकळ्ळी पालिकेची तक्रार
कुंकळ्ळी, (प्रतिनिधी)ः संजयदत्त-मान्यता विवाहासंबंधी आवश्यक असलेला मान्यताचा वास्तव्य दाखला मिळवण्यासाठी दाखल केलेला व आवकवहीत ३८२४ क्रमांकाखाली दि. ६फेब्रुवारी रोजी नमूद झालेला अर्ज निवासी दाखला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे कारकुनाच्या टेबलावरून हिसकावून घेत आलेल्या दोघांनी तिथून काढता पाय घेतला. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची भेट घेतली असता श्री. फर्नांडिस म्हणाले की, कुठलाही सरकारी दस्तावेज कारकुनाच्या नकळत किंवा परवानगीशिवाय त्यांच्या टेबलावरून उचलणे, पळवणे किंवा हिसकावून घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा ठरत असून आवक वहीत ३८२४ क्रमांकाखाली नमूद झालेला हा अर्ज कायदेशीररीत्या नगरपालिकेची अधिकृत मालमत्ता ठरते. सबब वरील अर्ज घेऊन गेलेला दोघांवरही कायदेशीर कारवाई करणे हे आपले कर्तव्य ठरत असून आज आपण त्या दोघांवरही कुंकळ्ळ्ी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
Wednesday, 20 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment