पोलिसांकडून विनाकारण मारहाण ः जेनिफर
मुलालाही नाहक अटक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर काढलेल्या मोर्चाशी कोणताही संबंध नसताना आपल्याला पकडून पोलिसांनी जबर मारहाण केली, तसेच पोलिसांनी आपल्या मुलाला जेवत असताना उचलून नेले. त्याला पाहण्यासाठी मी पोलिस स्थानकावर गेले होते. येथे मुलाची चौकशी करताना अचानक महिला पोलिसांनी आपल्या केसांना धरून फरफटत आत नेले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्रीही आपल्याला पोलिसांनी मारल्याची तक्रार आज जेनिफर मोन्सेरात यांनी न्यायालयात केली.
न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत जेनिफर हिला कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने मारहाण झाली, याची चाचणी करून न्यायवैद्यक विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. प्रथम न्यायालयाने आमदार बाबूश मोन्सेरात यांना "तुम्हांला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का?' असा पुन्हा पुन्हा प्रश्न केला. यावेळी ते मौन बाळगून उभे राहिले. यामुळे न्यायालयाने त्याला मारहाण न झाल्याचे गृहित धरून त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर जेनिफर यांना हाच प्रश्न करण्यात आला. यावेळी त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सदर तक्रार मांडली. "माझ्या मुलाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, तसेच तो मोर्चातही सामील झाला नव्हता, असे असतानाही पोलिसांनी त्याला पकडून नेले', अशी व्यथा तिने न्यायालयासमोर मांडली. यावेळी या प्रकरणातील अन्य चार संशयितांना न्यायालयाने तोच प्रश्न विचारला असता, मायकल फर्नांडिस यानेही आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले. बाबूश आमदार असल्याने पुरावे नष्ट करुन साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता व्यक्त करून सरकारी वकील सोरोजीनी सार्दिन यांनी बाबूशचा जामीन रद्द करुन पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. बाबूश व जेनिफर मोन्सेरात यांच्या वतीने ऍड. अरुण ब्राझ डिसा व दत्तप्रसाद लवंदे यांनी बाजू मांडली तर अन्य चार संशयातांच्या वतीने ऍड. हनूमंत नाईक, सर्वेश कामत व शिल्पा नाईक यांनी बाजू मांडली.
Thursday, 21 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment