Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 22 February 2008

एका मातेचा आक्रोश...माझा मुलगा निरपराध होता. आजारीही होता. बाहेरच्या जगात काय चाललेय याची त्याला कल्पनाही नव्हती. परंतु सूड उगवण्याच्या तयारीने आलेल्या पोलिसांनी त्याला जेवणाच्या ताटावरून उचलले आणि पोलिस स्थानवर नेऊन गुरासारखे मारले. पोलिस आले आहेत एवढाच त्याचा कापरा आवाज मी ऐकला. मी घरी धाव घेतली, तेथे वॉचमनकडून कळले की अमितला पोलिसांनी उचलून नेले आहे. जिवाच्या आकांताने मी पोलिस स्थानकात धाव घेतली. तेथे दारातच पणजीचे निरीक्षक मला दिसले. त्यांच्याकडे अमितची चौकशी केली तर निरीक्षकांनी चक्क आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मात्र नंतर जे काही घडले ते अत्यंत भयानक होते. कोणीतरी केसांच्या झिंज्या पकडून मला फरफटत आत नेले, जमिनीवर पाडले व लाथा बुक्क्यांनी मिळेल तसे मारले. एखाद्या सराईत गुन्हेगारालाही अशी मारहाण केली जात नाही, परंतु पोलिस आमच्या जिवावरच उठवले होते. मला माझी चिंता नाही. ती सगळी मारहाण सोसताना मला चिंता होती ती माझ्या मुलाची. मी बराच वेळ तेथे पडून होते. थोड्या वेळाने अमित मला तेथे दिसला. मी त्याला तुला मारहाण झाली का, असे विचारले तर त्या निरपराध मुलाने चक्क शर्ट काढून माराचे व्रण दाखवले. चेहऱ्यावरही व्रण होते. एका निष्पापावर असा अत्याच्यार करण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या कायद्याने दिला? मात्र आज येथे एका गोष्टीची मी जरूर शपथ घेईन की ज्या लोकांनी माझ्या मुलावर अन्वन्वित अत्याचार केले त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. आज माझ्या मुलावर हे अत्याचार झाले, परंतु उद्या इतरांनाही हेच भोगावे लागेल, त्यामुळे पोलिसांना अत्याचाराचे हक्क देणे हे समाजाच्या दृष्टीनेच धोक्याचे आहे. मुलाला साधा ताप आला तरी आई कळवळते, माझ्या मुलावर झालेला अन्याय आई म्हणून मी कदापि सहन करणार नाही, आणि ज्यांनी तो केला त्यांना कदापि सोडणार नाही.
मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची मला पर्वा नाही, परंतु मुलाच्या मनावर पडलेल्या व्रणाचे काय? त्या सगळ्या पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एका आईचे मन त्याशिवाय शांत होणार नाही.
पोलिसांच्या अत्याचाराच्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या, परंतु स्वतः घटनेचा अनुभव आल्यामुळे ते किती अमानुष आणि हिंस्त्र बनू शकतात याचा प्रत्यय आला. त्या रात्री अमितसोबत घरी जेवणारा माल्कम हा त्याचा मित्र पोलिसांना माझा थोरला मुलगाच वाटला व त्यांनी मिळेल तशी त्याला मारहाण केली. एक दंडुका त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात बसल्याने तो बेशुध्द पडला. मात्र तो मेला असावा असे समजून पोलिसांनी त्याला गाडीतून खाली ढकलून दिले. तो मेला की जिवंत आहे याची चौकशीही त्यांनी केली नाही. किती हे क्रौर्य?... जामिनावर सुटलेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी आपली कैफियत पत्रकारांसमोर मांडली. मोन्सेरात यांचा पुत्र अमित अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. पत्रकार परिषदेत हजर असलेल्या अमितने आपणावर झालेल्या अत्याचारांची कहाणी मोडक्यातोडक्या शब्दांत कथन केली.
दरम्यान, आपल्या मुलाला लवकरच मुंबईला उपचारासाठी नेणार असून मानवी हक्क आयोगाकडेही या संदर्भात आपण दाद मागणार असल्याचेही जेनिफर यांनी सांगितले. पोलिस हे रक्षक नसून भक्षक आहेत हीच गोष्ट या प्रकरणातून सिध्द होत असल्याचे त्या म्हणाल्या.

No comments: