Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 February 2008

वास्तव्याचा दाखला
आता मान्यताला

नोटीस पाठविणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- संजय दत्तच्या पत्नी मान्यता हिने विवाह नोंदणीवेळी सादर केलेल्या वास्तव्याच्या दाखल्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
संजय दत्त व मान्यता यांनी विवाहासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सासष्टी तालुक्याचे उपनिबंधक चंद्रकांत पिसुर्लेकर यांच्यासमोर सादर केले होते. सदर रहिवासी दाखल्यावरूनच ही विवाह नोंदणी झाली होती त्यामुळे ती खोटी ठरल्यास हा विवाहच बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई हे सध्या या वादग्रस्त रहिवासी दाखल्यासंबंधी चौकशी करीत आहेत. सदर रहिवासी दाखल्यासंबंधी प्रथमदर्शनी संशय बळावल्याने हा दाखला दिलेले तलाठी प्रशांत कुंकळ्ळीकर यांना निलंबित करण्याचा आदेशही जारी करण्यात आला होता. सदर रहिवासी दाखल्यासाठी मान्यताचे गोव्यातील सहा महिने वास्तव्य असणे गरजेचे आहे त्यामुळे ती खरोखरच गोव्यात सहा महिने होती काय, यासंबंधीची चौकशी सध्या सुरू आहे. यासंबंधी सदर तलाठ्याने हा रहिवासी दाखला देताना मामलेदार कार्यालयालाही विश्वासात घेतले नाही, असाही प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी जबाबदार अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे संकेत मिळाले असून जर खरोखरच मान्यता सहा महिने गोव्यात वास्तव्यास होती हे सिद्ध झाले तर मात्र हा दाखला ग्राह्य धरता येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

No comments: