भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आक्रमक कार्यक्रम जाहीर
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): राज्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवात मातृभाषांचा जयघोष करण्याचे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आले आहे. माध्यमप्रश्नी सरकारी निर्णयाच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी पणजीत ‘महादिंडी’चे आयोजन करण्यात येणार असून वर्षअखेरीस साजरा होणारा यंदाचा ‘इफ्फी’ महोत्सव उधळून लावला जाईल, असा कडक इशारा मंचातर्फे देण्यात आला आहे.
आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी प्रा. सुभाष देसाई, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, प्रा. सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, प्रा. पांडुरंग नाडकर्णी व किरण नाईक उपस्थित होते. श्रीमती काकोडकर पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या उपक्रमांमध्ये मराठी व कोकणी भाषांवर सरकार व कॉंग्रेस पक्षाने केलेला आघात आणि अन्यायाविरुद्ध निषेध ठराव, जागृतीविषयक व्याख्याने आणि आरास व सजावट तसेच देखाव्यांच्या माध्यमांतून आपला निषेध प्रकट करून या आंदोलनाला बळकटी प्राप्त करून द्यावी. मातृभाषेवरील समर्पक श्लोकांचा व आशयाचा वापर करण्याचे आवाहनही गणेशभक्तांना करण्यात आले आहे.
५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता काणकोण येथे सुमारे एक हजार युवकांची जाहीर सभा होईल. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मडकई मतदारसंघातील दोन खांब, शंकर पाठशाळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्यातील सुमारे पाच हजार भजनी कलाकार मातृभाषेवरील अन्यायाविरुद्ध पणजीत ‘महादिंडी’ काढणार आहेत. भाषा माध्यमप्रकरणी दुटप्पी धोरण स्वीकारलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्री व आमदारांना घेराव घालण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ‘इफ्फी’ उद्घाटनावेळी पंधरा ते वीस हजार गोमंतकीय रस्त्यावर उतरून हा सोहळा उधळून लावतील, असेही शशिकलाताईंनी सांगितले.
भाषा माध्यम प्रश्नाची सांगड राजभाषा आंदोलनाशी घालून काही स्वार्थी लोकांनी चालवलेल्या अपप्रचाराला अजिबात बळी पडू नये, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले. भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठी व कोकणीचे रक्षण हा मंचाचा हेतू आहे व त्यामुळे या आंदोलनाला बदनाम करणार्या किंवा त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणार्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल, असा सल्लाही श्रीमती काकोडकर यांनी दिला.
----------------------------------------------------------------------
‘केजी’त मातृभाषाच हवी!
पूर्व प्राथमिक संस्थांच्या नावाने ‘केजी’चे जाळे पसरवून मुलांना लहान वयातच इंग्रजीच्या मोहजाळ्यात अडकवण्याचा डाव हाणून पाडावा लागेल, असे मत प्रा. पांडुरंग नाडकर्णी यांनी व्यक्त केले. ‘केजी’ संस्थांवरील नियंत्रणासाठी कायदा करण्याची तयारी सुरू असताना तिथे फक्त मातृभाषेतूनच मुलांशी संवाद व्हावा, असेही ते म्हणाले. ‘केजी’च्या नावाने बालमनावर इंग्रजीचे संस्कार करून त्यांनी इंग्रजी हेच प्राथमिक शिक्षणाचे माध्यम म्हणून निवडावे, असा घाट घालण्यात येत आहे. हे कारस्थान वेळीच हाणून पाडावे लागेल, असेही ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------------
पुढील आंदोलनाचे टप्पे
- ५ ऑगस्ट : काणकोण येथे युवकांची जाहीर सभा.
- ६ ऑगस्ट : दोन खांब - मडकई येथे जाहीर सभा.
- १५ ऑगस्ट : भजनी कलाकारांतर्फे ‘महादिंडी’.
- ‘इफ्फी’चा उद्घाटन सोहळा उधळण्यासाठी सुमारे पंधरा ते
वीस हजार मातृभाषाप्रेमी सज्ज. सर्व रस्ते रोखून धरले जातील.
Saturday, 30 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment