विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : प्रा. पार्सेकर
पणजी, दि.२९ (प्रतिनिधी): राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने सर्वच क्षेत्रांत बजबजपुरी माजवली असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अभद्र प्रयोग करून हे सरकार शिक्षणाची अक्षरशः खिल्ली उडवत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतर आता दोन विषयांत नापास झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ही शिक्षणाची क्रूर थट्टाच आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षप्रवक्ते राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते.
सरकारने १२ जुलै रोजी काढलेल्या नव्या आदेशानुसार, अकरावीत दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ मिळून तो बारावीत बसू शकतो. यापूर्वी फक्त एका विषयात नापास झालेल्यांना ही संधी मिळत होती. मात्र उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होऊन आज दोन महिने उलटले आहेत. नापास विद्यार्थ्यांनी अन्य अभ्यासक्रमांसाठी (आयटीआय इत्यादी) प्रवेश घेतला आहे. काहींनी शिक्षण सोडून नोकर्या धरल्या आहेत. त्यामुळे उशिराने हा आदेश काढण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न प्रा. पार्सेकर यांनी उपस्थित केला. सरकारच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी व पालकांचा शिक्षणावरचा विश्वास उडून या क्षेत्राचे अधःपतन होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणमंत्री आपल्या कुवतीप्रमाणे निर्णय घेत आहेत व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालून शिक्षणाचा बाजार मांडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रा. पार्सेकर यांनी यावेळी ‘अंतर्गत मूल्यमापन’ धोरणाबाबतही नाराजी व्यक्त केली व बदल करावयाचेच असतील तर ते शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर करावेत, असा सल्ला दिला. माध्यान्ह आहार योजनेवर सरकारचे अजिबात लक्ष नसल्यामुळे या योजनेचा फज्जा उडाला असून मुलांचे जीव धोक्यात आले असल्याची टीका त्यांनी केली.
बनावट नोटांप्रकरणी पोलिस
अधिकार्यास अटक करा : आर्लेकर
गोव्याचे पोलिस अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतल्याचे जगजाहीर होते; मात्र, आता पोलिस बनावट नोटा प्रकरणातही सामील असल्याने गोव्याची सुरक्षाव्यवस्था धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन यावेळी राजेंद्र आर्लेकर यांनी केले. पकडलेल्या संशयितांना बनावट नोटा पुरवणार्या ‘त्या’ पोलिस अधिकार्याला त्वरित अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Saturday, 30 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment