आमदार दयानंद मांद्रेकरांचा टोला
म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी): शिवोलीचे आमदार या नात्याने दयानंद मांद्रेकर यांनी गेल्या तीन कार्यकाळांत काहीच केले नाही, असा आरोप आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत आहेत. विश्वजित राणेंच्या या आरोपांना आमदार दयानंद मांद्रेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आरोग्यमंत्री म्हणतात ते सत्य असून त्यांच्याप्रमाणे राजकारणात आपण पैसा केला नाही हे अगदी खरे आहे, अशी कोपरखळी मारून त्यांनी विश्वजित राणे यांना घायाळ केले आहे.
प्रादेशिक आराखड्याच्या नावाने येथील भूखंडांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची दलाली आपण मिळवली नाही, ‘सेझ’च्या नावाने शेतकर्यांच्या जमिनी बड्या उद्योगांना कवडीमोल दरांत विकण्याचे पाप आपल्या हातून घडले नाही, ‘पीपीपी’च्या नावाने सरकारी मालमत्ता खाजगी कंपनीच्या घशात घालून तिथेही दलाली उकळण्याचा घोटाळा आपण केलेला नाही, जनतेच्या कष्टाच्या पैशांवर चैन करण्याचे महापाप आपल्या कुटुंबाकडून कधी घडले नाही, अशी उपहासगर्भ टिप्पणी करून, या सर्व बाबतीत आपण निष्क्रियच ठरलो हा विश्वजित राणेंचा आरोप खराच असल्याचा टोला आमदार मांद्रेकर यांनी हाणला.
शिवोली मतदारसंघाच्या विकासासाठी व येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी कोणते योगदान दिले याची पोचपावती जनताजनार्दन देईल. विश्वजित राणे यांच्याप्रमाणे आत्मस्तुती करण्याची सवय आपल्याला नाही. ‘पैसा कुठून येतो हे विचारू नका, मिळतो तर घेत राहा’, अशी भाषा वापरणारे नेते गोव्याचे काय भले करणार आहेत याचा बोध आत्तापासूनच जनतेने घ्यावा, असा सल्लाही आमदार मांद्रेकर यांनी दिला. शिवोलीतील जनता भोळीभाबडी जरूर आहे, पण आपला आत्मसन्मान तिने राखून ठेवला आहे. पैसा फेकून राजकीय तमाशा करू पाहणार्यांना शिवोलीकर अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आमदार दयानंद मांद्रेकर यांनी बोलून दाखवला.
Saturday, 30 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment