मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व चर्चिलना जबरदस्त शह
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पाठिंबा लाभलेले झेवियर फियेलो यांचा ५ मतांनी पराभव करत प्रतिमा कुतिन्हो यांनी गोव्यात अनेक वर्षांनी झालेली कॉंग्रेस युवक अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. प्रतिमा कुतिन्हो यांना ३४० मते मिळाली तर झेवियर फियेलो यांच्या पारड्यात ३३५ मते पडली.
चर्चिलकन्या वालंका आलेमाव हिला या निवडणुकीत अपात्र ठरवल्यामुळे प्रतिमा कुतिन्हो व झेवियर फियेलो यांच्यातच सरळ लढत होणार हे निश्चित होते. मात्र, प्रतिमा कुतिन्हो मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या होत्या व त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याशी अंतर्गत वैर होते. प्रतिमा कुतिन्हो युवा अध्यक्ष होणे हा आपला नैतिक पराभव ठरणार असल्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, प्रचारप्रमुख माविन गुदिन्हो व कन्येच्या निलंबनामुळे दुखावलेले चर्चिल आलेमाव यांना हाताशी धरून प्रतिमा कुतिन्हो यांच्या पाडावासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यासाठी कुंभारजुवे येथील युवा उमेदवार झेवियर फियेलो यांच्या मागे त्यांनी आपली सर्व शक्ती उभी केली. परंतु, राज्यातील युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वरील चौकडीचे मनसुबे धुळीला मिळवत युवा कॉंग्रेससाठी गेली बारा वर्षे काम केलेल्या मडगावच्या नगरसेविका प्रतिमा कुतिन्हो यांना विजयी केले.
दबाव भरपूर, तरीही विजयी : प्रतिमा कुतिन्हो
पणजीत मतमोजणीनंतर बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, आपणास पराभूत करण्यासाठी अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी दबाव झुगारून आपले कार्य पाहून आपणास मते दिली. फातोर्डाचे विजय सरदेसाई, युवा अध्यक्ष संकल्प आमोणकर व पती सावियो कुतिन्हो यांच्या पाठिंब्यामुळेच आपण निवडून आलो, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांना मिळालेली मते : अहमद निनावले ४३, गौरी शिरोडकर ६४, गौतम भगत ६३, गोकुळदास सावंत ६२, जितेश कामत ८५, मुल्ला उर्फान २०, स्नेहा खोर्जुवेकर ०२, प्रतिमा कुतिन्हो ३४०, सुमंगल गावस ०३, सुनील नाईक ०३, सुनील शेट्ये ५६, ओबालिनो डायस ३७ व झेवियर पीटर फियेलो ३३५.
Friday, 29 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment