आरोग्यमंत्र्यांच्या मग्रुरीला भाजपचे चोख उत्तर
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - म्हापसा येथील जिल्हा इस्पितळासंबंधी भाजपने केलेल्या मागणीला उद्देशून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अश्लाघ्य भाषेचा वापर केला. विरोधी आमदारांनी वाळपईत येऊन आपल्याविरोधात बोलावे, असे आव्हान देत गावगुंडगिरीची भाषाही त्यांनी वापरली, याचा अर्थ राजकारण म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे, असे त्यांना वाटते की काय, अशी बोचरी टीका आज प्रदेश भाजपध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. सभापती प्रतापसिंग राणे यांनी ४० वर्षे राजकारण केले. या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर विरोधकांनाही सन्मानाने वागवले. ४० वर्षांत जे पित्याने कमावले ते हा पुत्र आता अवघ्या ४० महिन्यांत धुळीस मिळवायलाच पुढे सरसावलेला आहे, अशा कडक शब्दांत प्रा. पार्सेकर यांनी विश्वजित राणेंना फैलावर घेतले.
विश्वजित राणे यांनी आपल्या बेताल वक्तव्यांना वेळीच लगाम घालणे योग्य ठरेल, असा सल्ला पार्सेकर यांनी दिला. उत्तर गोव्यातील लाखो लोकांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी बांधण्यात आलेले म्हापशातील जिल्हा इस्पितळ सुरू करण्यावरून त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारीत असल्याची घोषणा पार्सेकर यांनी केली. येत्या १५ ऑगस्टपूर्वी जिल्हा इस्पितळ सुरू झाले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. तसेच या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना सर्वस्वी सरकार जबाबदार ठरेल, असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वापरलेल्या मस्तवाल भाषेचा खरपूस समाचार आज प्रदेश भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने घेतला. याप्रसंगी प्रा. पार्सेकर यांच्यासह शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, साळगावचे आमदार दिलीप परुळेकर व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा हजर होते.
जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणाचा डाव विश्वजित राणे यांच्याकडून आखला जात आहे. हे इस्पितळ आम आदमीचे आहे. त्यामुळे खाजगीकरणाला भाजपचा विरोध असेल, असेही प्रा. पार्सेकर म्हणाले. उद्या १६ रोजी यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खाजगीकरणासंबंधी जनतेला अंधारात न ठेवता सरकारने उघड भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळासंबंधी विधानसभेत २९ ऑगस्ट २००८ रोजी आरोग्यमंत्र्यांनी यांनी दिलेल्या उत्तरात सहा महिन्यात इस्पितळ सुरू करू, असे आश्वासन दिले होते. नंतर उच्च न्यायालयात ऍडव्होकेट जनरल यांनी सरकारच्यावतीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३० जुलै २००९ पर्यंत हे इस्पितळ सुरू होईल, असे सांगितले. आता हेच आरोग्यमंत्री डिसेंबरची भाषा बोलत आहेत. आरोग्यमंत्र्यांचे कालचे विधान हा न्यायालयाचा अवमानच आहे. या अवमानाबद्दल येत्या विधानसभा अधिवेशनात त्यांना जाब विचारला जाणार असल्याचे संकेतही प्रा. पार्सेकर यांनी यावेळी दिले.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर
विश्वजित राणे यांनी मंत्रिपदाचा त्याग करून एक सामान्य व्यक्ती म्हणून निवडणुकीला सामोरे जावे, असे जाहीर आव्हान देत मंत्रिपदामुळे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून वाळपईवासीयांना भुलवण्याची नाटके बंद करा, असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला. यापूर्वीच्या सर्व आरोग्यमंत्र्यांना निष्क्रिय ठरवून आपणच गेल्या तीन वर्षांत या खात्याचा कायापालट केला, अशी शेखी मिरवताना राज्यात सर्वाधिक काळ सरकारचे नेतृत्व त्यांच्याच वडिलांनी केले, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा खोचक सल्लाही प्रा.पार्सेकर यांनी आरोग्यमंत्र्यांना दिला.
ही आरोग्य खात्याची दलालीच
"पीपीपी' या शब्दाची खिल्ली उडवत शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी आरोग्यमंत्र्यांनी या खात्याची दलालीच चालवली आहे,अशी रेवडी उडवली. आरोग्य खात्याचा कारभार चालवण्यासाठी विश्वजित राणे यांनी डॉ. विली डिसोझा व दयानंद नार्वेकर यांच्याकडे "शिकवणी' घ्यावी,असे सांगत वाळपईत येण्याचे आव्हान भाजप आमदारांना देणाऱ्या विश्वजित राणे यांना वाळपई म्हणजे मिरासदारी वाटते की काय, असा खडा सवालही त्यांनी केला. भाजप आमदारांना त्यांनी वाळपईत येण्याचे आव्हान दिले आहे खरे; परंतु ते मात्र वारंवार विदेशांत तळ ठोकून बसतात अशी टीका करून वाळपईवासीयांचे जगणे व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर राहा आणि मगच बोला,असे खडे बोलही त्यांनी सुनावले. आझिलो इस्पितळ रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे व सध्या या इस्पितळाचा तेवढाच भाग नव्या इमारतीत स्थलांतरित करणे मोठी गोष्ट नसल्याचे स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.
आरोग्य खात्यानेच काल मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य रोगाची माहिती दिली. त्यात या रोगांचा कसा फैलाव होतो आहे हे उघड होते. अशावेळी आरोग्यमंत्री कोणत्या तोंडाने शेखी मिरवतात,असा सवाल साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांनी केला.
Friday, 16 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment