शपथविधीच्या "फियास्को'चा मुख्यमंत्र्यांवर ठपका
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - नेतृत्वबदलाच्या मागणीवर ठाम राहिलेल्या गटांतच फूट पाडून आपली खुर्ची शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरांचा पवित्रा धुळीस मिळवण्याची मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची योजना आता त्यांच्यावरच बूमरॅंग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अन्य एका मंत्र्याला वगळून आमदार पांडुरंग मडकई व दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळात घेण्याची त्यांची योजना अखेरच्या क्षणी फोल ठरली. त्यामुळे बंडखोरांना त्यांच्याविरोधात रण माजवण्याची आयतेच संधी मिळाली आहे.
काल राजभवनवर आयोजित केलेल्या कथित शपथविधी सोहळा रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय वर्तुळात कमालीची शांतता पसरली होती. याप्रकरणी अनेक नेते तथा कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भाष्य करण्यासही नकार दिला. मुख्यमंत्री कामत यांच्याविरोधातील बंडखोर गटानेही शांत राहणेच पसंत केल्याने ही वादळापूर्वीची शांतता तर नसावी ना,अशी शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
मुळात काल माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे पत्रकारांना शपथविधीसाठी आमंत्रित करणाऱ्या कथीत "एसएमएस'मुळेच हा सगळा गोंधळ उडाला, त्यापूर्वी शपथविधीचा कुणालाच पत्ता नव्हता. हा "एसएमएस' नेमका कुणी पाठवला व तो कुणाच्या सांगण्यावरून पाठवण्यात आला, याचाही तपास काही राजकीय निरीक्षक लावत आहेत. मुख्यमंत्री कामत यांनी आखलेली व्यूहरचना लक्षात आल्यानंतर त्यांची गच्छंती करण्यासाठीच कुणीतरी हा डाव साधला असावा,असेही बोलले जात आहे.माहिती खात्यात मुख्यमंत्री सोडून अन्य कुणा मंत्र्याचा किंवा राजकीय नेत्याचा वरचष्मा चालतो, याचाही तपास सुरू आहे.
या "एसएमएस' संबंधी माहिती खात्याचे संचालक मिनीन पेरीस यांना विचारले असता त्यांनी हे केवळ "मिसकम्युनिकेशन' असल्याचे सांगून हा विषय निकालात काढला. आता असे असेल तर शपथविधीसंबंधीचे नेमके "कम्यनिकेशन' कुणाचे होते,असा सवाल केला जात आहे. राजभवनवरील सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तेथे शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते व सर्व तयारीही सज्ज करण्यात आली होती. ऐनवेळी मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांचीही बरीच पंचाईत झाल्याचेही कळते. पांडुरंग मडकईकर यांच्यासाठी सुदिन ढवळीकर व नार्वेकर यांच्यासाठी बाबुश मोन्सेरात यांचे मंत्रिपद काढून घेण्याचाही डाव होता,असेही कळते. या डावात बंडखोरांना नामोहरम करण्याबरोबर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपद्रवमूल्य कमी करण्याची चाल मुख्यमंत्री कामत यांनी आखली होती. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना परावृत्त करण्याच्या वार्तेमुळेही बराच गोंधळ निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री कामत यांच्या यांनी मांडलेल्या या डावामुळे आता "ग्रुप ऑफ सेव्हन' पुन्हा सक्रिय बनला आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस तथा निरीक्षक बी.के.हरिप्रसाद हे उद्या २८ रोजी गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात असले तरी यावेळी मात्र त्यांना नेतृत्व बदलासंबंधी निर्वाणीचा इशारा देण्याचाही निर्णय या गटाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. हरिप्रसाद यांनी यावेळीही थंडा प्रतिसाद दिला तर मात्र येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचा वचपा काढू, असा इशारा देण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे.
Sunday, 28 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment