Sunday, 28 February 2010
सीमाशुल्क चुकवल्याप्रकरणी गुजरातेत उद्योजकाला अटक
सीबीआयच्या गोवा शाखेची कामगिरी
१.०७ कोटीचे सीमाशुल्क चुकवले
उद्योजकाला आज गोव्यात आणणार
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गुन्हा अन्वेषण खात्याच्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोवा शाखेतर्फे "मेसर्स अदाणी एक्सपोर्टस् लिमिटेड' समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अदाणी यांना आज सकाळी अहमदाबाद येथे अटक करण्यात आली. सीमा शुल्क खात्याच्या दहा अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून सुमारे १.०७ कोटी रुपये सीमाशुल्क चुकवल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत "सीबीआय' गोवा शाखेचे अधीक्षक एस. एस. गवळी यांनी ही माहिती दिली. राजेश अदाणी यांना उद्या २८ रोजी गोव्यात आणले जाईल, असेही ते म्हणाले. मेसर्स अदाणी एक्पोर्ट लिमिटेड, अहमदाबाद, मेसर्स गणेश बेन्झोप्लास्ट लिमिटेड, मुंबई, सीएचए क्लिअरींग हाऊस व मेसर्स जे. ए. एफ.लेतांव ऍण्ड सन्स यांनी गोवा सीमा शुल्क व केंद्रीय अबकारी खात्याच्या दहा अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुमारे १.०७ कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवल्याप्रकरणी २५ एप्रिल २००८ रोजी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दहा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी या विविध कंपन्यांशी हातमिळवणी करून व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून २००५-०६ या काळात नाफ्ता व फर्नेस तेलाचा प्रत्येकी एक मोठा साठा आयात केला होता. मेसर्स अदाणी एक्सपोर्ट कंपनीकडून हा साठा आयात करण्यात आला व तो मेसर्स गणेश बेन्झोप्लास्ट लिमिटेड, वास्को यांच्या अधिकृत गोदामात ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क खात्यातील अधिकाऱ्यांनी या साठ्याची सीमाशुल्काची आकारणी कमी केली होती. त्यात अधिकृत गोदामाची मुदतही संपली होती, त्यामुळे या व्यवहारात सुमारे १.०७ कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडाला होता, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
अहमदाबादमध्ये येथे राहणारे राजेश अदाणी हे मुख्यतः अदाणी कंपनीच्या बिझनेस रिलेशन आणि मार्केटिंग-फायनान्सची जबाबदारी सांभाळतात. त्यांना अटक करून चौकशीसाठी व जबानीसाठी रिमांड घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती श्री. गवळी यांनी दिली. या प्रकरणांत आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे व त्याबाबतची तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना गोव्यात आणले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment