'जी-७' व प्रदेश कॉंग्रेसच्या ओढाताणीत
मुख्यमंत्री कामत यांची अभूतपूर्व कोंडी
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात "जी -७'च्या एकाही मंत्र्याला हात लावायचे धाडस कराल तर पस्तावाल! आणि यदा कदाचित तसा प्रयत्न झालाच तर हा गट सरकारला पाठिंबा देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास मोकळा असेल, असा सणसणीत दम "जी- ७' गटाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भरला. या गटाच्या एकाही सदस्याच्या विकासकामांत कोणताही अडथळा येता कामा नये किंवा त्यांना कोणत्याही कामांत आर्थिक कमतरता भासता कामा नये, अशी तंबीच या गटाने दिली. दरम्यान, सरकारांतर्गत प्रदेश कॉंग्रेस व कॉंग्रेसेतर असे दोन गट निर्माण झाल्याने या दोन्ही गटांना सामोरे जाताना मुख्यमंत्री कामत यांची मात्र त्रेधातिरपीट उडालेली असून त्यांची विलक्षण कोंडी झाली आहे.
"ग्रुप ऑफ सेव्हन' या नावाखाली एकत्रित झालेल्या कॉंग्रेसेतर नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सरकारी निवासस्थानी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर, मगोचे नेते वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर लगेच सव्वा दोन वाजता या सातही जणांनी थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक देऊन त्यांची भेट घेतली. तिथे सुमारे चाळीस मिनिटे चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत अलीकडेच घडलेल्या शपथविधी सोहळ्याचे पडसाद उमटल्याचीही खबर आहे. त्या विषयावरून या गटाने मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावल्याची खबरही सूत्रांनी दिली. कामत यांनी या गटात फूट पाडण्यासाठी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना डच्चू देऊन कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचा घाट घातला होता. मात्र, आता यापुढे अशा प्रकारची कोणतीही शक्कल लढवल्यास ती अजिबात सहन केली जाणार नाही. या गटाचा पूर्ण पाठिंबा कॉंग्रेसला असेल; पण जर का या गटातील एकाही मंत्र्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर तो अजिबात सहन करणार नाही व तसे घडल्यास पुढील सर्व घडामोडींस मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, अशी गर्भित धमकीच या गटाने मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे कळते.
या गटाने आपले श्रेष्ठी म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ढवळीकरांवरील गंडांतर टाळल्याने आता या गटालाही हत्तीचे बळ चढले आहे. पवार यांनी केलेल्या सुतोवाचाची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठीच ही भेट घेतली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी अधिक स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. "जी-७' हा गट एकसंध आहे व या गटाचा कॉंग्रेस सरकारलाच पाठिंबा राहील, असे सांगण्यासाठीच गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. वाहतूकमंत्री ढवळीकर यांनी मात्र या गटातील एकाही मंत्र्याला हात लावायला मिळणार नाही हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केल्याचे सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मात्र याप्रसंगी पत्रकारांशी बोलण्याचेच टाळले.
आपले कुटुंबच आध्यात्मिक
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या पत्नी ज्योती ढवळीकर यांचा संबंध सनातन संस्थेशी आहे. मडगाव बॉंबस्फोट प्रकरणात त्यांना गोवण्याचे कारस्थान सरकार दरबारी सुरू आहे व त्यावरूनच ढवळीकर यांचेही मंत्रिपद काढून घेण्याची शक्कल कॉंग्रेसने लढवली होती, अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ढवळीकर यांच्या पत्नीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडेही कागदपत्रे सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुदिन ढवळीकर यांना यासंबंधी विचारले असता, त्यांनी आपल्या पत्नीबाबत पसरलेल्या वृत्तांबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, असे सांगितले. आपले कुटुंब पूर्वापारपासून म्हणजेच गेली साडेतीनशे वर्षे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. आपली पत्नी आध्यात्मिक प्रवचने देते व कार्यक्रमांतही सहभागी होते. कुटुंबाची हीच परंपरा सध्या सुरू आहे व यापुढेही सुरू राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, सुदिन ढवळीकर यांचे प्रतिस्पर्धी गृहमंत्री रवी नाईक यांच्या इशाऱ्यावरच हा प्रकार सुरू आहे, असेही उघडपणे बोलले जात आहे. पण त्याबाबत आपल्याला काहीही खबर नाही, असे ते म्हणाले.
Wednesday, 3 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment