Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 4 March 2010

इंधन दरवाढीवरून संसदेत 'भडका'

नवी दिल्ली, दि. ३ : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या निर्णयावरून आज अपेक्षेप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहात भडका उडाला. पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी झाल्याच पाहिजेत, अशी विरोधकांची घोषणाबाजी लोकसभा - राज्यसभेत घुमली आणि अवघ्या काही मिनिटांतच दोन्हीकडचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
गेल्या आठवड्यात, २६ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. त्याचा तात्काळ निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला आणि तिथेच ही दरवाढ स्फोटक ठरणार, हे स्पष्ट झाले.
होळी - रंगपंचमीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे कामकाज आज सुरू झाले आणि रस्त्यावरचा "राडा' दोन्ही सभागृहात पेटला. लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारताच समाजवादी पार्टीचे खासदार हौद्यात उतरले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. भाजप खासदारही त्यांच्या पाठोपाठ मैदानात आले आणि आवाज चांगलाच वाढला. विरोधकांचा हा पवित्रा पाहून मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज तासभर तहकूब करणेच पसंत केले. राज्यसभेतही असाच प्रकार बघायला मिळाला.
दरम्यान, कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज होणार असून त्यावेळी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी कॉंग्रेस खासदारांना इंधनाचे अर्थकारण समजावून सांगणार आहेत. कारण कॉंग्रेस खासदारांनीही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तीव्र विरोध केला आहे. महागाई विरोधात देशातील सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र येत भारत बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश आले असल्याचा आरोप "एनडीए'चे संयोजक शरद यादव यांनी केला आहे. आंदोलनाची निश्चित तारीख ठरली नसून, लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
आयातीतील घोटाळ्यामुळे साखर कडू झाली!
साखरेच्या वाढत्या भावामागे आयातीत झालेला घोटाळा कारणीभूत असल्याची राळ उडवून देत विरोधकांनी आज राज्यसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, कृषिमंत्री शरद पवारांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला.
दरवाढीच्या प्रश्नावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विशेषतः भाजप आणि डावे पक्ष या निमित्ताने एकत्र आले होते. पवारांच्या काळात साखरेचा "महाघोटाळा' झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्नाला उत्तर देताना, "संबंधित काळात सरकारतर्फे एक किलोभरही साखर आयात करण्यात आलेली नाही, असा खुलासा पवारांनी केला. पण विरोधक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
दरवाढीच्या प्रश्नावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आज तीन वेळा तहकूब करावे लागले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी, साखर आयात करून ती खासगी विक्रेत्यांच्या हाती सोपविण्यात सरकारची संशयास्पद भूमिका दिसते आहे, असा आरोप केला.

विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पवारांनी तासभर भाषण केले. पण त्यात त्यांना अनेक मुद्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी करत, प्रतिप्रश्न करत अडविण्याचे धोरण ठेवले. साखरेच्या आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित होणाऱ्या अन्नधान्यांच्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नांना पवार बगल देत आहेत, असा विरोधकांचा आक्षेप होता.

डाळी, पीठे, बटाटे आणि कांदे या पदार्थांच्या किमती खाली आल्या आहेत असा दावा करून सरकारने गहू व तांदूळ यांची किमान आधारभूत किंमत गेल्या पाच वर्षांत सत्तर टक्क्यांनी वाढविली आहे. मात्र, तरीही काही अपरिहार्य कारणांचा महागाईवर परिणाम होत असल्याचे पवार म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून सरकारने अनेक उपाय योजले आहेत आणि यापुढेही या दिशेने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

No comments: