Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 2 March 2010

पेडणे किनारी भागांत स्थानिक बनले गुलाम

विदेशी नागरिकांच्या मनमानीपणाकडे
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानाडोळा

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी भागांत विदेशी नागरिकांच्या वर्चस्वाला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लाळघोटेपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढाच भूखंड विक्री व पर्यटनामुळे स्थानिक लोकांसाठी निर्माण झालेल्या व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी याही जबाबदार आहेत. मोरजीतील टॅक्सीचालक रोहिदास शेटगांवकर यांच्या मृत्यूमुळे मोरजीवासीयांनी विदेशींविरोधात व विशेषतः रशियन नागरिकांच्या दादागिरीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या खऱ्या, पण या गावातील बहुतांश स्थानिकांची आर्थिक मदार ही याच विदेशी नागरिकांवर अवलंबून असल्याने पुढील काळात त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील, अशी भीतीही व्यक्त होते आहे.
पेडणे तालुक्यातील मोरजी व मांद्रे भागात मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिकांनी आपले बस्तान बसवले आहे. या विदेशी नागरिकांनी विशेषतः रशियन लोकांनी स्थानिकांकडून त्यांचे व्यवसाय भाडेपट्टीवर घेतले आहेत व या संपूर्ण किनारपट्टीत आपले जाळे पसरवले आहे. व्यवसायाचा हा करार अलिखित असल्याने कायदेशीर कारवाई करण्यासही अनेक अडथळे निर्माण होतात. आश्वे मांद्रे येथील स्काय बार अँड रेस्टॉरंट चालवणारा विदेशी नागरिक कॉस्ता याने या भागात इतरही अनेक शॅक्स व भाडेपट्टीवरील खोल्या घेतल्या आहेत. मुळात हा व्यवसाय स्थानिकांच्या नावावरच चालतो, त्यामुळे पर्यटन खात्याला कारवाई करणे शक्य होत नाही. पर्यटन खात्याचे भरारी पथक किनारी भागातील शॅक्सची पाहणी करतात, त्यावेळी स्थानिक शॅक्स मालक तिथेच हजर असतात. अशावेळी कारवाई करावी तरी कशी, असा सवाल पर्यटन खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांनी उपस्थित केला.
मांद्रे येथील स्काय बार अँड रेस्टॉरंटचे पक्के बांधकाम लुईस डिसोझा या स्थानिक नागरिकाचे आहे. मुळात हे बांधकाम "सीआरझेड' क्षेत्रात येते, अशी माहिती स्थानिक पंचायतीने दिली. हे बांधकाम "सीआरझेड' क्षेत्रात असूनही त्याला पर्यटन खात्याकडून व्यवसायाचा परवाना देण्यात आला व त्यामुळे पंचायतीलाही ना हरकत दाखला देणे भाग पडले, असे सांगण्यात आले. दरम्यान, पर्यटन खात्याने मात्र याचे खापर स्थानिक पंचायतीवर फोडले असून हे बांधकाम "सीआरझेड' कक्षेत येत असल्यास त्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार स्थानिक पंचायतीला आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
स्काय बार ऍँड रेस्टॉरंटच्या बाजूलाच किनाऱ्याला टेकून कॉस्ता याने काही काळापूर्वी मातीचा भराव टाकून पार्टीसाठी जागा तयार केली. याबाबत "सीआरझेड' कडे तक्रारही दाखल झाली असली तरी त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. "सीआरझेड' बाबत कारवाई करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे "सीआरझेड' ची पायमल्ली केलेल्या या बांधकामावर कारवाई करण्याचे सोडूनच द्या, पण त्यांना संगीत पार्टीसाठी परवाना देण्याचे काम उपजिल्हाधिकारीच करीत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. स्काय बार ऍँड रेस्टॉरंट हे मुख्य रस्त्यालाच टेकून आहे. तिथे पार्किंगची व्यवस्थाही नाही, असे असूनही उपजिल्हाधिकारी कोणत्या आधारावर याठिकाणी पार्टी करण्यास परवानगी देतात, असा सवालही करण्यात आला.
दरम्यान, या विदेशी लोकांकडून प्रशासकीय परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजले जातात, त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारींना हे अधिकारी केराची टोपली दाखवतात, अशीही नाराजी काही लोकांनी केली. स्थानिकांनी तक्रार केल्यास तक्रारदाराचे नावही उघड केले जात असल्याने मग तक्रारदाराला धमक्या देण्याचे सत्र सुरू होते. उपजिल्हाधिकारी व पोलिस याकामी विदेशी लोकांचे दलाल या नात्यानेच काम करतात व त्यामुळे स्थानिकांना संरक्षण देण्याचे सोडून हे लोक विदेशी लोकांचेच हित जपतात, असा आरोपही करण्यात आला आहे.

No comments: