Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 April 2009

मंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश

मोबाईलवरून धमकीप्रकरण
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शर्मीला पाटील यांनी जुने गोवे पोलिसांना दिले.
समाजकार्यकर्ते तथा वकील आयरिश रॉड्रिगीस यांना "मोबाईल'वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिस तक्रार त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मंत्री राणे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करत असल्याचे सांगून अचानक त्या प्रकरणाच्या तपासाची फाईलच बंद केली होती. ही बाब ऍड. रॉड्रीगीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. गेल्यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला होता. न्यायालयाला आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे ही गंभीर बाब असल्याने त्याची त्वरित पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आलेत.
दि. २३ सप्टेंबर ०८ रोजी सरकारी वकील व्हिनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात युक्तिवाद करताना धमकी प्रकरणात आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती गोवा खंडपीठाला दिली होती. त्यावेळी न्यायालयात जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे उपस्थित होते. तरीही, अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसून तपासाच बंद करण्यात आल्याची युक्तिवाद ऍड. रॉड्रिगीस यांनी केला होता. यावेळी डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशनच्या सल्ल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आल्याची भूमिका निरीक्षक गावडे यांनी घेतली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे श्री. गावडे यांच्या विरोधात अवमान याचिकाही सादर करण्यात आली आहे.
राजकीय दबावापोटी आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्या विरोधातील तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या जुने गोवे पोलिसांना या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची चाहूल लागताच तब्बल २२ दिवसांनंतर ही तक्रार नोंदवून घेतली होती.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्नीच्या मोबाईलवरून आपल्याला जिवानिशी मारण्याची धमकी दिल्याचे ऍड. आयरिश रॉड्रिगिस यांचे म्हणणे आहे. त्यांनी याप्रकरणी दि. ३१ जुलै रोजी जुने गोवे पोलिसांशी संपर्क साधला, मात्र तक्रार दाखल करून घेण्यात पोलिसांनी टाळाटाळ चालवली होती. त्यानंतर मंत्री राणे यांच्या विरोधात भा.दं.सं ५०६(२) कलमानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला.
दि. ३१ जुलै ०७ सकाळी ८.१५ वाजता निनावी दूरध्वनीवरून "धीस इज विश्वजित राणे, बी कॅअरफुल, आय व्हील गॅट यू शूट" अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर अँड. रोड्रीगीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निनावी दूरध्वनी विश्वजित राणे यांनी केल्याचा दावा करून खळबळ माजवली होती.
त्यानंतर काही दिवसांनी दि. ३१ जुलै रोजी आलेला धमकीचा कॉल हा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या राणे यांच्या मोबाईलवरूनच आला होता, अशी माहिती उघडकीस आली होती. यासंबंधीचे पुरावेही रॉड्रिगिस यांनी "आयडिया सेल्युलर' कंपनीकडून मिळवले होते.

No comments: