शुक्रवारी मतदानासाठी चोख बंदोबस्त
पणजी, दि.२० (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीसाठीच्या निमित्ताने सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी उद्या २१ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपेल. उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून राज्यात भा.दं.सं चे १४४ कलम लागू करण्याचे आदेश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले असून हे कलम २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपर्यंत लागू राहणार अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी के.एस.सिंग यांनी दिली.
गोव्यात येत्या २३ रोजी लोकसभेसाठी मतदान होईल. निवडणूक आयोगाने मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाची मागणी करण्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता ही संपूर्ण जबाबदारी गोवा पोलिसांवर आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी पोलिस संरक्षणाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यासाठी एक अधीक्षक,१२ उपअधीक्षक,१२ निरीक्षक,६० उपनिरीक्षक,४३ साहाय्यक उपनिरीक्षक,३६९ पुरुष व महिला हवालदार,१२११ शिपाई व १४८ गृहरक्षक असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी यापूर्वीच पोलिसांना आदेश दिले होते परंतु आता ही संख्या वाढवावी लागणार असल्याने ते आदेश उद्यापर्यंत जारी केले जातील,असेही यावेळी त्यांनी सांगितले.यंदा विविध अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर खास निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली जाईल तसेच काही महत्त्वाच्या केंद्रांवर व्हिडिओ कॅमेरांची सोय करण्यात आल्याने निदान याठिकाणी पोलिसांची अतिरिक्त प्रमाणात गरज भासणार नाही,असे श्री.सिंग म्हणाले.
उत्तर गोव्यात एकूण ३७६ मतदान केंद्रे आहेत त्यातील १३२ मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील असल्याचे ते म्हणाले.दोन्ही जिल्हातील प्रत्येक मतदान केंद्र संबंधित मुख्यालयाशी जोडले गेले आहे. मतदानावेळी कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास तसेच मतदानाबाबतची माहिती मुख्यालयाकडे ठरावीक तासांत पोहचेल,असेही ते म्हणाले. दरम्यान, मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना एक दिवस अगोदर मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागेल व त्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर गोव्यात मतदान शांत व मुक्त वातावरणात पार पडावे यासाठी विविध अशा ६३ समाजकंटक तथा गुन्हेगारी प्रकरणांत गुंतलेल्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी दिली. या सर्वांना ताकीद देण्यात येणार असून त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रसंगी त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून लोकशाहीतील आपला हा महत्त्वाचा हक्क बजावावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
राज्यात उद्या २१ पासून संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते २३ तारखेपर्यंत रात्री ९ वाजेपर्यंत १४४ कलम लागू राहणार आहे.या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक माणसांनी जमाव करणे,मिरवणुका,मोर्चा काढणे यावर बंदी राहील.निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीने धावणारी प्रचाराची वाहने धावणार नाहीत.२३ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरातील हॉटेल,खानावळी,बार,चहाची दुकाने व इतर आस्थापने बंद राहतील,असेही या आदेशात म्हटले आहे.
Tuesday, 21 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment