Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 19 April 2009

भ्रष्ट कारभारा विरोधात मतदान करा


फोंड्यातील जाहीर सभेत पर्रीकरांकडून कॉंग्रेसचे वाभाडे


फोंडा, दि.१८ (प्रतिनिधी) - भ्रष्ट, दिशाहीन आणि स्वार्थी कारभाराविरोधात मतदान करून कॉंग्रेसला धडा शिकवा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आज संध्याकाळी येथे केले. सिल्वानगर येथील वैश्य सेवा संघाच्या मैदानावर आयोजित प्रचंड जाहीर सभेत विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर बोलत होते.
या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार नरेंद्र सावईकर, फातोर्डाचे आमदार दामू नाईक, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, सांग्याचे आमदार वासुदेव गावकर, काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार प्रकाश वेळीप, प्रा. गोविंद पर्वतकर, फोंड्याचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, उपनगराध्यक्ष अँड. वंदना जोग, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. मुक्ता नाईक, प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, रूपेश महात्मे, दत्ता खोलकर, मनोहर आडपईकर, उमेश नाईक, फोंडा गटाध्यक्ष उदय डांगी आदी मान्यवर उपस्थित होते.
दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडून आल्यावर लोकांबरोबर राहून विकासाची गंगा मतदारसंघात आणू, सामान्य लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. कॉंग्रेसचे खासदार मतदारसंघात विकासकामे राबवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे यावेळी परिवर्तन करून लोकांनी सेवा करण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन सावईकर यांनी केले.
भाजपला दक्षिण गोव्यात मिळणारा पाठिंबा पाहून कॉंग्रेसच्या नेत्याच्या पायाखालील वाळू घसरू लागल्याने त्यांनी बेछूट आरोप सुरू केले आहेत. केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे प्रचारासाठी टपालाचा वापर करण्याची मान्यता देण्यात आली आहे. या योजनेखाली आपण प्रचारासाठी खात्याकडे शुल्क जमा करून प्रचार केला, असे स्पष्टीकरण सावईकर यांनी केले.
येत्या २३ एप्रिल ०९ रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून येऊन १९९९ ची पुनरावृत्ती होणार आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. दक्षिण गोव्यातील उमेदवार नरेंद्र सावईकर हे सुशिक्षित असून गेले कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मतदारांकडून सावईकर यांना भरघोस पाठिंबा लाभत आहे, असे श्री. नाईक म्हणाले की, भाजप राजकीय क्षेत्राकडे एक मिशन म्हणून पाहत आहे. पैसा जोडण्याचा धंदा नव्हे. अटलबिहारी यांचे सरकार केंद्रात असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. टेलिफोन, गॅस सिलिंडर सर्व सामान्य लोकांना तात्काळ मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात आले. गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला विकास कुणी विसरू शकत नाही. भाजपने कर्तव्य भावनेने काम केले. आज देशाची स्थिती पुन्हा एकदा बिकट बनलेली आहे. पाण्यासारखी मूलभूत सुविधा सरकार जनतेला उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावत आहे. गोव्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे ऐकून अंगावर काटा उभा राहतो. देशातील जनता सुरक्षित नाही. "पोटा' कायदा रद्द करण्यात आला. त्याच्या बदल्यात दुसरा कायदा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे देशात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थिती भाजप हा एक पर्याय असून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची ताकद पक्षाच्या सक्षम नेत्यामध्ये आहे, असेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
भाजपचे नेते श्री. पर्रीकर यांच्या राजवटीत गोव्याचा दूरदृष्टीने विकास साधण्यात आला. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या सोयीच्या योजना तयार करण्यात आल्या. आजच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, सेझ, कॅसिनो, सीआरझेड सारख्या असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत. ह्याकडे प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मतदारांनी गतस्मृतींना उजाळा द्यायला हवा. पर्रीकर यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामांचा आढावा घेऊन आपल्या प्रभावी मत शक्तीचा चांगले सरकार स्थापन करण्यासाठी वापर केला पाहिजे, असे दामू नाईक यांनी सांगितले.
आमदार विजय पै खोत यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या विचारसरणीची कार्यकर्त्यांना आठवण करून देऊन त्या विचारसरणीनुसार पक्षाच्या विजयासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. आमदार महादेव नाईक, आमदार महादेव नाईक, आमदार रमेश तवडकर, प्रकाश वेळीप, राजेंद्र आर्लेकर यांची भाषणे झाली. या सभेला माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर, सुभाष वेलिंगकर आदींची उपस्थिती लाभली. उदय डांगी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनी केले. पार्किंगची व्यवस्था चोख असल्याने सभेच्या ठिकाणी गैरसोय झाली नाही. सभेत भाजपच्या जयजयकाराने मैदान दणाणून गेले.

विमानातीलबिघाडामुळे मोदी पोहोचले नाहीत
या सभेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. मात्र, सोलापूर महाराष्ट्र येथील प्रचार सभेतून गोव्यात येत असताना विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने श्री. मोदी फोंड्यात पोहोचू शकले नाहीत. ही माहिती विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात दिली. भाजपची लोकसभा निवडणुकीची विजयी सभा याच मैदानावर आयोजित करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सभेला आणण्यात येईल, असे पर्रीकर यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने सारा परिसर दणाणून टाकला.

No comments: