Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 23 April 2009

राहुल, पवार, स्वराज व पासवान प्रमुख उमेदवार

१४१ मतदारसंघांत आज मतदान
दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत झाल्या असून कॉंग्रेसचे युवराज व राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान या दिग्गज नेत्यांच्या भाग्याचा निर्णय या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मशीनबंद होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशात २६५ जागांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या असतील. म्हणजे ५४५ सदस्य संख्या असलेल्या सभागृहातील बहुमतासाठी लागणाऱ्या जादूई आकड्यासाठी सात जागांची निवडणुकीत झालेली नसेल. अँग्लो-इंडियन समुदायातून दोन जणांची नामनियुक्ती करण्यात येत असल्यामुळे लोकसभेच्या ५४३ जागांसाठीच ही पाच टप्प्यात निवडणूक होत आहे.
राहुल गांधी यांनी गांधी घराण्याचा परंपरागत मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपला बारामती मतदारसंघ मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासाठी सोडून स्वत: माढा मतदार संघाची निवड केली आहे. सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून तर रामविलास पासवान बिहारच्या हाजीपूर मतदार संघातून उभे आहेत.
तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कमल नाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आपले भाग्य अजमावीत आहेत. याशिवाय अखिलेश प्रसाद सिंग (पूर्व चम्पारण, बिहार), रघुवंश प्रसाद सिंग (वैशाली, बिहार) आणि रघुनाथ झा (वाल्मिकीनगर, बिहार) हे नावाजलेले उमेदवारही दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत एकूण २,०४१ उमेदवार निवडणूक लढवत असून यात १२१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यांचा विचार करता दुसऱ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २०, आसाममधील ११, बिहारमधील १३, गोव्यामधील २, जम्मू-काश्मीरमधील १, कर्नाटकातील १७, मध्य प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील २५, मणिपूरमधील १, ओरिसातील ११, त्रिपुरातील २, उत्तर प्रदेशातील १७ आणि झारखंडमधील ८ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

No comments: