कॉंग्रेस मंत्र्यांमध्ये वाढती अस्वस्थता
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - कुंभारजुवेचे आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांना विद्यमान मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवून देण्यासाठी लोकसभेच्या निकालानंतर अर्थात १६ मे नंतर प्रयत्न करणार असल्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या घोषणेमुळे सध्या कॉंग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे. मडकईकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी एका मंत्र्याला जागा खाली करावी लागेल असा विश्वजित यांच्या घोषणेचा अर्थ असल्याने मंत्रिपदावरून डच्चू कोणाला दिला जाईल हा सध्या काही मंत्र्यांच्या अस्वस्थतेचा विषय बनला आहे. त्यातच चर्चिल आलेमाव त्यांच्याविरुद्धची अपात्रता याचिका सभापतीसमोर असल्याने हे चर्चिल यांच्यावरील गंडांतराचे तर संकेत नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे.
कुंभारजुवेचे आमदार तथा विधानसभेतील अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव मंत्री असलेले पांडुरंग मडकईकर यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पदावरून खाली उतरवून मगोचे सुदिन ढवळीकर यांची मंत्रिपदावर वर्णी लावली होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून आलेल्या दबावाखालीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता अशी माहिती खुद्द सरकार पक्षातील काही नेत्यांनीच त्यावेळी दिली होती. आता त्याच विश्वजित राणे यांच्याकडून मडकईकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचे वचन जुनेगोवे येथे झालेल्या मडकईकर यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कामत यांनी मडकईकर यांचा विश्वासघात केला अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची बनली आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींनीही मडकईकर यांना मंत्रिमंडळ फेरप्रवेशाची हमी दिली होती परंतु ती सुध्दा पूर्ण केली गेली नाही. ही जबाबदारी आता विश्वजित यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदावर आरूढ करण्यात यश मिळवल्यास मडकईकर यांना आपल्या नियंत्रणात ठेवता येईल तसेच अनुसूचित जमातीची सहानुभूतीही आपल्याकडे वळवता येईल असे हे गणित आहे. मडकईकर यांचा मंत्रिमंडळ फेरप्रवेश ही विश्वजित राणे यांची राजकीय खेळी भविष्यात स्वतःचे घोडे पुढे दामटण्यासाठीच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
उत्तर गोव्यात कॉंग्रेसला सुरुंग
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात पाडून घेण्यात यश मिळाल्यानंतर आता या जिल्ह्यातील वीसही मतदारसंघात कॉंग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला सुरुंग लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान,देशप्रभू यांच्यासाठी कॉंग्रेस नेते सक्रियपणे प्रचार करीत नसल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर विश्वजित राणे यांनी आपल्या गटातील इतर सहकाऱ्यांबरोबर देशप्रभू यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्तर गोव्यात देशप्रभू यांना निवडून आणून आपली राजकीय ताकद दिल्लीत सिद्ध करण्याचा चंगच सध्या विश्वजित राणे यांनी बांधला आहे. उत्तर गोव्यात कॉंग्रेसचा प्रभाव असलेल्या काही मतदारसंघांवर सरकारातील बिगर कॉंग्रेस नेत्यांनी आपली नजर वळवली असून कॉंग्रेसचे "हात' हे चिन्हच हद्दपार करून कॉंग्रेस मतदारांना आपल्याकडे वळवण्याची लोकसभेच्या निमित्ताने चांगलीच संधी मिळाल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. या संधीचा यथायोग्य वापर करून पुढील राजकीय डावपेचांची तयारी सध्या या नेत्यांनी चालवली आहे. विश्वजित राणे यांनी सत्तरी आपला प्रभाव प्रस्थापित केला आहे. डिचोली तालुक्यावर प्रभाव टाकण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. आता पेडण्यात घुसण्याचा प्रयत्नही त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालवला आहे. मांद्रे मतदारसंघातून माजीमंत्री संगीता परब यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करून त्यांनी सुरुवात केली होती. आता देशप्रभूंच्या निमित्ताने पेडण्याची स्वप्नेही ते पाहू लागले आहेत. मडकईकरांना प्रयत्न केल्यास तिसवाडीत आपल्याला पाय रोवण्यास मिळेल असाही त्यांचा अंदाज आहे. मात्र त्यांची ही खेळी ऐन लोकसभा निवडणुकीत उलटण्याची दाट शक्यता आहे. मडकईकर हे कोणाच्या अधीन होण्याची शक्यता नसल्याने आपले ईप्सित साध्य करण्यासाठी ते विश्वजितची मदत घेऊ शकतील परंतु विश्वजित यांच्या इशाऱ्यावर ते नाचतील याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, ही लोकसभा निवडणूक गोव्यातील केवळ दोन जागांसाठी लढवली जात असली तरी या निमित्ताने काही नेत्यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा विस्तार करण्याचे डावपेच आखल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.
Monday, 20 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment