Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 22 April 2009

गोव्याच्या दोन्ही जागा भाजपलाच मिळणार

पर्रीकर यांना ठाम विश्वास
पणजी, दि.२१ (प्रतिनिधी) : गोवा पूर्णतः भाजपमय झाला असून यंदा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. उत्तरेत श्रीपाद नाईक प्रचंड बहुमताने विजयी होतील ,तर दक्षिणेत ऍड.नरेंद्र सावईकर हेही चांगल्या फरकाने बाजी मारतील,असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. "वोटबॅंके' च्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अल्पसंख्याकांना गृहीत धरून त्यांची कॉंग्रेसने फसवणूक केली. तथापि, यावेळी हे मतदार कॉंग्रेसला चांगलाच धडा शिकवण्याच्या मूडमध्ये असल्याचे प्रचारकाळात दिसून आले. भाजपसाठी ही सर्वात मोठी व निर्णायक बाजू ठरेल, असेही पर्रीकरांनी नमूद केले.
आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेच्या नावाखाली बोलबोला केला जातो खरा; परंतु या निवडणुकीतही पैशांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर त्यांना रोखता आला नाही, अशी टीका पर्रीकर यांनी केली.
आपल्या स्वार्थासाठी भाजपशी कधी ना कधी जवळीक साधलेले कॉंग्रेस नेते आता मतदारांमध्ये भाजपबाबत भीतीचे वातावरण पसरवत आहेत. कॉंग्रेस पक्षात एकमेव निष्ठावंत म्हणून राहिलेले जीतेंद्र देशप्रभू यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास लावून त्यांनी बाटवले, असा टोला त्यांनी हाणला. स्विस बॅंकेतील २५ हजार कोटी रुपये परत देशात आणण्याबाबत कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते गप्प का,असा सवालही पर्रीकर यांनी केला."खावे त्याला खवखवे'या उक्तीप्रमाणे कॉंग्रेस नेत्यांची स्थिती झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
भाजपने प्रचारकाळात महागाई,सुरक्षा व बिघडत चाललेली आर्थिक स्थिती हे विषय मतदारांपर्यंत नेले.दरवाढ हा विषय प्रत्येकाला लागू पडत असल्याने सामान्य लोकांचे या सरकारने कसे कंबरडे मोडले याची प्रचिती लोकांना आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या काळात अनेक अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यात साखर,तूरडाळ,खाद्यतेल आदींचा समावेश आहे. सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अत्यंत बिकट आहे.मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांकडून दिवसाढवळ्या हल्ले होतात याचा अर्थ काय,असा सवालही पर्रीकर यांनी केला.
सार्दिन यांना घरी बसवा
आपण जनतेला भेटणार नाही. जनतेची कामे असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याकडे यावे,असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या सार्दिन यांच्यावर येथील लोक संतापले आहेत. खासदार या नात्याने लोकांकडे जाणार नाहीत तर आता प्रचारासाठी ते का फिरतात? आपल्या निवडणूक कार्यालयात बसून त्यांनी प्रचार करावा,असे खुद्द त्यांचेच सहकारी उघडपणे बोलतात.सार्दिन यांची कदाचित खासदारकीमुळे दमछाक झाली आहे व अशावेळी त्यांना आता मतदारांनी आराम देणेच योग्य असल्याचे पर्रीकर म्हणाले.ऍड.नरेंद्र सावईकर यांनी दक्षिण गोव्यातील बहुसंख्य मतदारांशी संपर्क साधला आहे व त्यांना भरीव प्रतिसाद मिळाला आहे.या मतदारसंघात ९० टक्के कार्डांचे वाटपही झाले असून यावेळी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा चंगच या लोकांनी बांधल्याचे ते म्हणाले.
श्रीपाद नाईक रेकॉर्ड मोडणार
उत्तर गोव्यात खासदार श्रीपाद नाईक यांची हॅटट्रिक निश्चित आहे.गतनिवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतसंख्येत वाढ होईल. ही जागा भाजपलाच मिळणार आहे.भाजप केंद्रात सत्तेवर आल्यास वचननाम्याची अंमलबजावणी करेल,असे त्यांनी सांगितले.

No comments: