श्रीपाद नाईक व सावईकरांना विजयाची खात्री
सार्दिन व देशप्रभूही आशावादी
मतमोजणी १६ मे रोजी
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - लोकसभेसाठी आज राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानात ५४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात ५९.७६ तर दक्षिण गोव्यात ५०.१३टक्के मतदान झाले अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी के.बी.सुरजुसे यांनी दिली. दोन्ही मतदारसंघातील मतदानाला लोकांनी दिलेला प्रतिसाद व एकूण मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहता विजय आपल्याच उमेदवारांचा होईल,असा दावा भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी केला आहे. उत्तरेत खासदार श्रीपाद नाईक यांना राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू टक्कर देणार आहेत तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे भवितव्य अधांतरी बनल्याचे वातावरण पसरले आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे.
१५ व्या लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत गोव्यातील उत्तर व दक्षिण अशा दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान झाले. सकाळी ७ वाजता सुरू झालेले हे मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहिले. काही ठिकाणी ५ वाजल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याने या मतदारांची मतदान ओळखपत्रे एकत्र करून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास परवानगी देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गोवा पोलिसांनी अत्यंत चोख पद्धतीने पार पाडली. राज्यात मतदानावेळी एकही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही,असे श्री.सुरजुसे म्हणाले. दक्षिण गोव्यात दोघा व्यक्तींना मतदानाला रांगेत उभे असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू आल्याचे प्रकार घडले. या घटनेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला कोणत्याही प्रकारची कुणीही माहिती दिली नाही,असे सांगून एकूण मतदान शांततेत पार पडले असेही श्री.सुरजुसे म्हणाले.
गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत मिळून १०,१९,९७७ मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केली होती त्यातील ५,४३,४६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.उत्तरेतील ४,८६,७८९ मतदारांपैकी २,७५,०४६ मतदारांनी भाग घेतला तर दक्षिणेतील ५,३३,१८८ पैकी एकूण २,६८,४१६ मतदारांनी आपले मतदान केले. गेल्या २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदान ५८.७७ टक्के झाले होते. त्यात उत्तरेत ५९.२९ तर दक्षिणेत ५५.२१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.आज झालेल्या मतदानात उत्तरेत सर्वांत जास्त पेडणे मतदारसंघात ६८.८१ टक्के मतदान झाले तर सर्वांत कमी ताळगाव मतदारसंघात ४२.६८ टक्के मतदानांची नोंद झाली. दक्षिणेत सर्वांत जास्त सांगे मतदारसंघात ५९.९४ तर सर्वांत कमी बाणावली मतदारसंघात ३८.५६ टक्के मतदानाची नोंद झाली.
नेत्यांची प्रतिक्रिया
उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.मतदारांची दिशाभूल करण्याचे तसेच नकारात्मक प्रचाराचा आधार घेऊन मतदारांना संभ्रमात टाकण्याचे बरेच प्रयत्न झाले परंतु त्यांना मतदार अजिबात भुलले नाहीत व त्यांनी निर्धाराने आपल्या पाठींशी राहण्याचे ठरवल्याने आपली हॅट्रीक निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत यावेळी भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी केलेले कार्य जनतेसमोर आहे, तर दक्षिण गोव्यात निष्क्रिय कॉंग्रेस उमेदवाराला पाडण्यासाठी जनता उच्चशिक्षित आणि तळमळीचे कार्यकर्ते असलेल्या सावईकरांनाच विजयी करील, असे पर्रीकर यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघातील टक्केवारी हेच दर्शविते,असे ते पुढे म्हणाले.
देशप्रभू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यावेळी मतदारांनी सुज्ञपणे आपला कौल दिला आहे व खऱ्या अर्थाने लायक उमेदवारालाच त्यांनी आपला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले. मगो पक्षाचे उमेदवार पांडुरंग राऊत यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने मगोत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.दक्षिणेत सार्दिन यांनी आपल्या विजयाबाबत सुरू असलेल्या शंकाकुशंका निकालानंतर फोल ठरणार असा दावा केला तर ऍड.सावईकर यांनी दक्षिण गोव्यातील जनतेने यावेळी निश्चितच बदलासाठी मतदान केल्याने काही फरकाने का असेना पण आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.
Friday, 24 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment