Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 April 2009

अहिल्या रांगणेकर यांचे देहावसान

मुंबई, दि. १९ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्याताई रांगणेकर यांचे आज सकाळी माटुंगा येथील निवासस्थानी ह्रुदयविकाराने निधन झाले.
त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांचा अंत्यसंस्कार उद्या सोमवारी दुपारी दादरच्या स्मशानभूमीत होणार आहे.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या अहिहल्याताई स्वराज्यात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत संघर्षरत राहिल्या. आदिवासी, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, अनाथ मुले आदींच्या समस्यांना त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली आणि या लोकांना न्याय मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला.
महागाईच्या विरोधात महिलांचा मुंबईतील मंत्रालयावर लाटणे मोर्चा नेण्याच्या अभिनव आंदोलनात मृणालताई गोरे यांच्यासोबत त्या आघाडीवर होत्या. तसेच, आणिबाणीच्या विरुद्ध झालेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनातही त्या हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.
आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अहल्याताई मुंबईतून लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्यांनी विधानसभेत ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागाचे प्रतिनिधित्वही केले होते. मुंबई महानगरपालिकेच्या त्या २१ वर्षे नगरसेविका होत्या.
मुळातच समाजकार्याची आवड असलेल्या अहिल्याताईंचा अनेकानेक सामाजिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्या भगिनी असलेल्या अहिल्याताईंचे पती कॉम्रेड रांगणेकर हेही कम्युनिस्ट चळवळीत होते. त्यांचे गतवर्षीच निधन झाले.

No comments: