वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) : मुरगावचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव ११ विरुद्ध ८ मतांनी संमत झाला असून त्यामुळे त्यांना खुर्ची रिकामी करावी लागली आहे.
आज दुपारी ३.३० वाजता पालिका सभागृहात याबाबत चर्चेसाठी बोलवलेल्या खास बैठकीला एकूण २० पैकी १९ नगरसेवक उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी दीपक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस मुख्याधिकारी एस. नाईक उपस्थित होते. बैठक सुरू होताच
कालुर्स आल्मेदा, चित्रा गावस, शांती मांद्रेकर, रोहिणी परब, राजेश घोणसेकर, किशोरी हळदणकर, नितीन चोपडेकर व शेखर खडपकर आदी सदस्यांनी नगराध्यक्षांवर विविध आरोपांचा भडिमार केला. त्यामुळेच नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर अविश्वासाच्या विरोधात काशिनाथ यादव व इतर नगरसेवकांनी नगराध्यक्ष हे सुसंस्कृत असल्याचे सांगतानाच त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले. नंतर नगराध्यक्षांनी आपण येथील जनतेच्या विकासासाठी अनेक कामे केल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
नंतर अविश्वासाबाबत मतदानास प्रारंभ झाला. विरोधी गटाने तेव्हा हात वर करून अविश्वास ठरावासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. मात्र नेहमीप्रमाणे मतदान होईल, असे निर्वाचन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर १९ पैकी ११ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला व अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मतदान आटोपताच निर्वाचन अधिकारी श्री. देसाई यांनी क्रितेश गावकर यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याचे जाहीर केले.
आता नवीन नगराध्यक्ष कोण, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून विरोधी गटातील सैफुल्ला खान याचे नाव आघाडीवर आहे.
उपनगराध्यक्ष सौ. चित्रा गावस यांच्यावर यापूर्वीच अविश्वास ठराव संमत झाला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची खुर्चीही सध्या खाली असून उद्या शनिवारी या निवडीबाबत पालिकेची बैठक बोलवण्यात आली आहे. सौ. गावस यांनाच पुन्हा एकदा ही खुर्ची लाभणार अशी वदंता आहे.
Saturday, 25 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment