नावेली सभेत कॉंग्रेस नेत्यांना घरचा अहेर
..चर्चिलचे कार्यकर्ते अनुपस्थित
..प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची पंचाईत
..फ्रांसिस सार्दिनवर थेट टीका
..ज्योकीमकडूनही शरसंधान
मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : कॉंग्रेसने आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांच्या नावेली मतदार संघातील ब्लास्को एक्झ्युक्युटीव्ह सेंटर मांडोप येथे आयोजित दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक प्रचारसभेत चर्चिल, जोकिम आदींनी सत्ताधारी पक्षाला घरचाच अहेर दिला तर तेथील मतदारांनीच केवळ नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांनीही या सभेपासून अलिप्त राहून सासष्टीतील मतदारसंघ हे आपली खासगी मालमत्ता समजणाऱ्यांना एक प्रकारे वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व त्यामुळे या सभेला उपस्थित असलेले प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांची अगदी केविलवाणी परिस्थिती झाली. अखेर त्यांनी गोव्याचे प्रश्र्न केवळ कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो हे मतदारांनी लक्षात ठेवावे असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
शिरोडकरांव्यतिरिक्त चर्चिल आलेमांव, जोकिम आलेमांव,उमेदवार फ्रांसिस सार्दिन, पर्यटक टॅक्सी संघटनेचे आलेक्स, बिशूट व इतरांची भाषणे झाली. मात्र कॉंग्रेसने नावेलीकर आपणामागे आहेत हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात हात दाखून अवलक्षण करून घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
चर्चिल यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व दिल्लीतील अन्य नेते सोडल्यास तमाम स्थानिक नेते व पक्षाचे अक्षरशः वाभाडे काढले . या लोकांना दिलेले वचन, करार यांचे काहीच सोयरसूतक नाही असे सांगताना वालंका उमेदवारी प्रकरणाचा शीण काढला. गेल्या वेळच्या वचनाप्रमाणे जर वालंकाला उमेदवारी दिली असती तर दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला एकदेखील सभा घेैण्याची गरज नव्हती असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. त्यांनी आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला व लोकांच्या इच्छेनुरुपच आपण वागल्याचे सांगितले. आपण अपात्रतेला भीत नाही असे सांगताना हिंमत असेल तर आपणाला अपात्र करूनच दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. आपणाला घरी बसावे लागले तरी पर्वा नाही पण सर्वांना घरी बसवेन असा इशारा त्यांनी दिले. कॉंग्रेसने दोनदा आपणाला राजकारण करायला लावले आता तिसऱ्यांदा ते करायला भाग पाडू नका असा सल्लाही त्यांनी दिला. कॉंग्रेस नेस्तनाबूद करायची असेल तर उद्याच आपणाला घरा बसवा व परिणाम काय होतात ते पहा, अशी गर्भित धमकी त्यांनी दिली व पक्षाध्यक्षांसह सारेच अवाक झाले. त्यांनी आपले भूतपूर्व प्रतिस्पर्धी लुईझिन यांची ढोंगी माणूस अशी संभावना केली.
प्रचारासाठी अन्यत्र जावयाचे असल्याने सार्दिन हे अगोदर बोलावयास उभे राहिले व बोलताना त्यांनी आपण मतदारांच्या भेटीस येत नसल्याबद्दल होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना बोलण्याच्या ओघात यावेळी सुध्दा निवडून आल्यावर आपण मतदारांना भेटण्याची प्रथा घालणार नाही. कोणाचे काही काम असेल तर त्यांनी आपणास भेटायला यावे असे सांगितले. त्यावरून विवाद निर्माण झाला व नंतर चर्चिल यांनी आपल्या भाषणात लोकप्रतिनिधीला असे बोलणे शोभत नाही, लोकप्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने लोकसेवक असतो असे स्पष्ट केले, कदाचित कोणत्या तरी तणावातून सार्दिन यांच्या तोंडून ते वाक्य गेलेले असू शकते तरी शिरोडकर यांनी त्यांना ते वाक्य मागे घेण्यास लावावे असे सांगितले. नंतर शिरोडकर यांनी सार्दिनकडून अशी चूक पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली.
अपात्रता याचिकेचे शिल्पकार लुईझिन
नगरविकास मंत्री जोकिम आलेमांव यांनी पांढरे कपडे घातले म्हणून कॉंग्रेसवाला होत नाही असा टोमणा नाव न घेता लुईझिन फालेरो यांना मारला व त्यांच्यामुळेच चर्चिलवर विविध प्रसंग ओढवल्याचे सांगितले. त्याच्यावर दाखल झालेल्या अपात्रता याचिकेचे शिल्पकार तेच असल्याचे सांगून टाकले. कॉंग्रेसला जर चर्चिलचा एवढा पुळका आहे तर या याचिकेमागील मित्रपक्षावर कारवाई कां झालेली नाही असा सवाल त्यांनी केला . पक्षाच्या या वृत्तीमुळे येथील लोक दुखावलेले आहेत व ते त्याच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणत आहेत असे सांगितले. हिंमत असेल तर चर्चिलच्या स्थानाला वा खात्याला हात लावून दाखवा, त्याचक्षणी आपला राजीनामा सादर केला जाईल असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी कुंकळ्ळीचे आपले प्रतिस्पर्धी जोर्सन फर्नांडिस व मिकी यांच्यावरही टीका केली व त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.
सभेतील एकंदर रागरंग पाहून स्तंभित झालेल्या सुभाष शिरोडकर यांनी या निवडणुकीत चर्चिल व वालंका यांच्यावर अन्याय झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले व भविष्यात तिला न्याय दिला जाईल असे आश्र्वासन दिले. पण उंदराच्या रागाने घराला आग लावण्याचा आततायीपणा करू नका अशी विनंती केली. चर्चिल यांना अपात्रतेची भीती नाही असा दिलासा देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला व सीआरझेडप्रकरणी संबंधितांना कायद्याने संरक्षण मिळवून दिले जाईल असे सांगितले. पर्यटक टॅक्सी वाल्यांच्या समस्यांवर १५ मे पर्यंत निर्णय घेण्याचे आश्र्वासन दिले.कॉंग्रेस हा विकास , प्रगती व बहुजन समाज यांचा पक्ष आहे तो वचनाचा पक्का व १२९० वर्षांची परंपरा असलेला पक्ष असून त्याच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की उत्तर गोवा भाजपने काबीज केला आहे दक्षिणेत कॉंग्रेसची मदार आहे ती सासष्टीवर तिला तडा देऊ नका, ती सांभाळा अशी विनवणीही त्यांनी केली. या सेंटरमधील अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.
"पर्यटक टॅक्सीवाले भाजपसोबत'
कॉंग्रेस सभेतील हवाच गेली
पर्यटक टॅक्सी संघटनेचे नेते आलेक्स यांचे भाषणही कॉंग्रेससाठी आज महागच पडले. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात आपण व आपली संघटना पूर्वींपासून चर्चिलबरोबर असतानाही टॅक्सीवाल्यांच्या १४ कलमी मागण्यांतील एकही मागणी सरकारला मान्य करता आलेली नाही म्हणूनच या निवडणुकीत पर्यटक टॅक्सीवाले भाजपबरोबर गेल्याचे सांगितले व कॉंग्रेसच्या सभेतील हवाच काढून घेतली. टॅक्सीवालेच सरकारला सर्वाधिक कर भरत असूनही सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर टॅक्सीवाले आपली वाहने आणून मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांच्या घरासमोर ठेवतील व स्वतः अमली द्रव्य विकायला बाहेर पडतील,असा इशारा दिला.
Monday, 20 April 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment