Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 19 November 2008

'द वॉरलॉर्डस'ने इफ्फीचा शुभारंभ

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): एकोणचाळिसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी-०८) ची तयारी झपाट्याने सुरू असून येत्या २२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात या शानदार सोहळ्याचे उद्घाटन होईल. या महोत्सवाची सुरुवात "द वॉरलॉर्डस' ने या चिनी चित्रकृतीद्वारे होणार आहे.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली.यावेळी चित्रपट संचालनालयाचे संचालक एस.एम. खान, मुख्य सचिव जे. पी. सिंग, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष तोमाझिन कार्दोझ आदी हजर होते.
उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री रेखा प्रमुख पाहुण्या असतील. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा,राज्यपाल एस. एस. सिद्धू, माहिती व प्रसारण सचिव,चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान व मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रुझ यांची खास उपस्थिती असेल.
महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी अभिनेता कमल हसन हे प्रमुख पाहुणे असतील व इराणी फिल्म " द सॉंग ऑफ दी स्पॅरोज" हा चित्रपट दाखवला जाईल. प्रतिनिधी नोंदणीचे काम २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून अंदाजे साडेसहा प्रतिनिधी नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. "इफ्फी'च्या कार्डांचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महोत्सवानिमित्त सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत. महोत्सवाच्या परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या मागवण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत कबीर बेदी,मनीषा कोईराला,अकबर खान,नसरूद्दीन शहा व त्यांचा मुलगा,पद्मिनी कोल्हापूरे,सचिन,सुप्रिया,पल्लवी जोशी आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही यावेळी असेल.
यंदा स्थानिक तथा पर्यटकांसाठी खास खुल्या तिकिटांची सोय करण्यात आली आहे. फक्त भारतीय चित्रपट पाहण्याची सोय या योजनेअंतर्गत राहणार असून दुसऱ्या दिवशीची तिकीटे आदल्या दिवशी निश्चित करून ठेवावी लागणार आहेत. फिचर फिल्म विभागाची सुरुवात "यारविंग'या चित्रपटाने होणार असून नॉन फिचर फिल्मची सुरुवात" मेमरिज,मुव्हमेंट ऍण्ड अ मशीन ' या चित्रपटाने होणार आहे.
भारतीय पॅनोरमाची सुरुवात "थॅक्स मॉ' या इरफान कमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने होणार आहे. संजय सुरकर यांचे "तंडाळा', दिबाकर बॅनर्जी यांचे "ओये लकी,लकी ओये", डॉ.मृणालिनी ए दयाल यांचा "दुहान',मनीश गुप्ता यांचा "स्टोन मॅन'," वन डे इन कोचीन" यासह राजेंद्र तालक यांचा "सावरीया डॉट कॉम' हा चित्रपटही या विभागासाठी निवडण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------
चौघा नामवंतांचा गौरव
चित्रपट क्षेत्रात अमौलिक योगदान दिलेल्या चौघा नामवंत कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली.शाल, श्रीफळ व ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या सत्काराचे स्वरूप असेल. त्यात मृणाल सेन,देव आनंद, के. बालचंद्रन व वामन भोसले यांचा समावेश आहे.

No comments: