डॉ. आमोणकरांबाबत भाजपची निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार
पणजी,दि.२१ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला त्यादिवशी डिचोलीतील एका पतसंस्थेतून कायम ठेवीतील ११ लाख रुपये काढल्याचे "सेव्ह गोवा फ्रंट'चे उमेदवार जुझे लोबो यांनी उघडकीस आणले आहे. हे पैसे त्यांनी कोठे गुंतवले किंवा खर्च केले याचा कोणताही हिशेब त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेला नाही. त्यामुळे विरोधी भाजपनेही त्यास तीव्र हरकत घेतली आहे. या पैशांचा पाळी पोटनिवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता वर्तवून निवडणूक निरीक्षकांनी ताबडतोब याची दखल घ्यावी,अशी मागणी भाजपने तक्रारीद्वारे केली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर उपस्थित होते. अपक्ष उमेदवार डॉ.आमोणकर यांच्याविरोधात सेव्ह गोवा फ्रंटचे उमेदवार जुझे लोबो यांनी दाखल केलेल्या तक्रारीची योग्य दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे,असे पर्रीकर म्हणाले. सुमारे ५० लाख रुपयांचा हिशेब प्रतिज्ञापत्रात सापडत नसल्याने त्याबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही,असेही पर्रीकर म्हणाले.
पाळी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. गेल्या १५ नोव्हेंबर २००८ रोजी वृत्तपत्रांवर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची जाहिरात प्रसिद्ध करून त्यात श्रीमती सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. ही गोष्ट निवडणूक निरीक्षकांच्या नजरेस आणून दिली असतानाही आज पुन्हा एकदा माध्यान्ह आहार योजनेची जाहिरात झळकली आहे.
दरम्यान,याबाबत पर्रीकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षकांची भेट घेऊन या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. यापूर्वी कामत सरकारला ५०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने तसेच मुख्यमंत्र्यांनी हाज यात्रेकरूंसाठी खास विमानसेवा पुरवण्याबाबत केलेल्या विधानासंदर्भातील तक्रारीवर त्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्याचेही पर्रीकर म्हणाले. केवळ नोटिसा काढून काहीही होणार नाही तर प्रत्यक्षात कारवाई होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
पाळी मतदारसंघात मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांची आमिषे दाखवली जात आहेत. काही स्वयंघोषित उमेदवारांनी तर एका मताला मताला २०० रुपये असा दर निश्चित केल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. पाळी मतदार विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाखूष असून गोव्याचा कसा बट्ट्याबोळ सुरू आहे, याबाबत त्यांच्यात तीव्र नाराजी पसरल्याने ते वचपा काढण्यासाठी सज्ज झाल्याचे पर्रीकर म्हणाले. पाळी पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला.
Saturday, 22 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment