Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 November 2008

केसरबाई संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन

पणजी, दि. १५ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात २८ व्या सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती तथा कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू, माजी उपाध्यक्ष परेश प्रभू, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, कार्य विभाग अधिकारी डॉ. गोविंद काळे, गायक डॉ. राजा काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व केसरबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गोव्याचे सुपुत्र रवींद्र च्यारी यांचे सतारवादन झाले. पुरीया, धनश्री, आलाप तोड, गत आणि झाला राग यावेळी सादर करण्यात आले. त्यांना तबल्यावर उस्ताद फजल कुरेशी यांनी साथ दिली. यानंतर राजा काळे यांनी गायन सादर केले. त्यांनी शुद्ध कल्याण राग सादर केला. तबल्यावर तुळशीदास नावेलकर तर हार्मोनियमवर राया कोरगावकर, तानपुऱ्यावर त्यांची कन्या अमृता काळे व सुभाष परमार यांनी साथ दिली.
दुसऱ्या सत्रात, उद्या रविवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन, पं. जगदीश प्रसाद यांचे गायन तर तिसऱ्या सत्रात संध्याकाळी ५ वाजता सराबोनी चौधरी यांचे गायन, मंगला भट यांचे नृत्य व निलाही कुमार यांचे सतारवादन होणार आहे.

No comments: