Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 16 November 2008

मडकईकर पुन्हा मंत्री होण्याचे स्पष्ट संकेत

मात्र बळी कोणाचा हे गुलदस्त्यातच
पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणूक पार पडताच अनुसूचित जमातीचे कॉंग्रेसचे एकमेव आमदार पांडुरंग मडकईकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल,असा ठोस आश्वासन दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांच्यासाठी मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. ती जबाबदारी श्रेष्ठींनी स्वतःकडे घेऊन या शिष्टमंडळाला निश्ंिचत मनाने गोव्यात परतण्याचा सल्ला दिला. शिष्टमंडळाचे एक सदस्य डॉ.काशिनाथ जल्मी यांनी दिल्लीतील या चर्चेला दुजोरा दिला.
सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत असताना मडकईकर समर्थकांनी पुन्हा आपले घोडे पुढे दामटण्यास सुरुवात केली आहे. पाळी पोटनिवडणुकीत सेव्ह गोवा फ्रंट पक्षाला मान्यता मिळाल्याने चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलेले विलीनीकरण फोल ठरले आहे. त्यामुळे या दोघांची अपात्रता जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. पाळी पोटनिवडणुकीच्या काळात याबाबत सभापती निर्णय जाहीर करणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे पाळी निवडणुकीनंतरच पुढील कार्यवाही केली जाईल,असे श्रेष्ठींनी सांगितल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. येत्या १५ दिवसांच्या आत मडकईकरांना मंत्रिपद दिले नाही तर कुंभारजुवे मतदारसंघातील अनुसूचित जमात पाळी पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधात काम करेल,असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ही मुदत संपल्याने या नेत्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री कामत यांनी याबाबत लगेच या शिष्टमंडळाबरोबर दिल्ली येथे श्रेष्ठींची भेट घेण्याचे निश्चित केल्यानंतर काल दिल्लीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळात पांडुरंग मडकईकर यांच्यासमवेत डॉ.काशिनाथ जल्मी,कांता गावडे व पाळी मतदारसंघातील अनुसूचित जमातीचे काही नेते हजर होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांची भेट झाली नसली तरी या शिष्टमंडळाने अहमद पटेल यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे.सध्या पाळी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू असल्याने या काळात मंत्रिपदावर नेमणूक करणे शक्य होणार नसल्याने ही निवडणूक संपताच मडकईकर यांची वर्णी निश्चित झाल्याचा शब्द त्यांना श्रेष्ठींनी दिल्याचेही या शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले.याप्रकरणी श्री.मडकईकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोंडा येथे "संभवामी युगे युगे' हे नाटक पाहण्यासाठी गेल्याने मोबाईलवर बोलणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: