मालेगावच्या बॉम्बस्फोटात महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जय वंदे मातरमच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज नाशिकच्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
मालेगाच्या बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा यांना केवळ त्यांच्या नावावर रजिस्टर असलेल्या मोटारसायकलच्या आधारे पकडण्यात आले आहे. स्फोटांच्या ठिकाणी जी मोटारसायकल आढळून आली, ती साध्वींच्या नावावर होती. परंतु, ही मोटारसायकल त्यांनी २००४ सालीच मनोज शर्मा नावाच्या इसमास २४ हजार रुपयांना विकली होती, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले असून, कोठडीत आपल्याला एटीएसकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोपही साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.
आपल्याला मारहाण केल्यानंतर रुग्णालयातही भरती करण्यात आल्याचे साध्वींनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, ज्यावेळी मालेगाव येथे स्फोट झाला, त्यावेळी आपण इंदूर येथे होतो आणि आपल्याला वकिलाशी सल्लामसलत करण्याचीही संधी देण्यात आली नाही, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
साध्वी प्रज्ञा यांचे वडील डॉ. चंद्रपालसिंग यांनी नुकतीच रेडिफ डॉट कॉम या वेबसाईटला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी आपली मुलगी प्रज्ञा निर्दोष असल्याचे म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिज्ञापत्रात मोटारसायकलबाबत जी बाब नोंदविली आहे, त्याची माहिती डॉ. सिंग यांनी या मुलाखतीत दिली होती.
साध्वी प्रज्ञा यांचा अपघात झाल्यानंतर तिला ती मोटारसायकल नको होती. त्यावेळी तिने ती विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. अपघाताच्यावेळी गाडीची कागदपत्रे हरविली होती. त्यावेळी गाडीची किंमत ४४ हजार रुपये होती. परंतु, विकताना ती गाडी मनोज शर्मा याला केवळ २४ हजार रुपयांत विकली होती. त्यानंतर मनोज शर्मा याच्या ताब्यात असतानाच ती गाडी चोरीला गेली होती. त्याने चोरीची तक्रारही केली नाही आणि साध्वी प्रज्ञा यांना त्याबाबत माहितीही दिली नाही. तक्रार का दिली नाही, असे मनोज शर्मा याला विचारले असता, मोटारसायकल माझ्या नावाने नसल्यामुळे मी तक्रार दिली नाही, असे उत्तर त्याने दिल्याचे डॉ. चंद्रपालसिंग यांनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.
माझ्या मुलीने साध्वी व्हावे यासाठी मीच तिला प्रोत्साहन दिले होते आणि साध्वी झाल्यापासून ती घरीही आली नाही. ती निर्दोष आहे. ती बॉम्बस्फोट करून माणसे मारण्याचे पाप करूच शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी म्हटले होते.
Tuesday, 18 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment