Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 20 November 2008

मुख्य प्रश्न सोडवण्यावरच भाजप वचननाम्यात भर

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रकाशन
डिचोली, दि. १९ (प्रतिनिधी) - पाळी मतदारसंघातील समस्यांची भाजपला पूर्णपणे जाणीव असून, धूळ प्रदूषण रोखणे, सुरक्षित रस्ते, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पाण्याची समस्या सोडविणे अशा दैनंदिन अडचणी दूर करण्यावर भाजपचा भर राहील, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी आज साखळी येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी श्री. नाईक यांनी भाजपचा वचननामा जाहीर केला.
भाजपला बहुजन समाजाबद्दल अजिबात स्वारस्य नाही, या खासदार शांताराम नाईक यांच्या आरोपाला उत्तर देताना, श्रीपाद नाईक यांनी हा आरोप फेटाळला. पांडुरंग मडकईकर, दयानंद नार्वेकर यांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्यांवर कॉंग्रेसने केलेले अन्याय प्रथम निस्तरावा, असा सल्ला त्यांनी दिला. वाढती महागाई, मूर्तिभंजनाचे प्रकार आणि सरकारची निष्क्रियता याला जनता कंटाळली आहे, याचा प्रत्यय २० ऑक्टोबरच्या "गोवा बंद' ने आणून दिला आहे, असे सांगून पाळीतील जागरूक आणि सुज्ञ मतदार डॉ.प्रमोद सावंत यांना निश्चितपणे निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच डॉ. सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांना समाजसेवेची पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्व. गुरुदास गावस हेही कॉंग्रेसला कंटाळले होते, त्यांनी तसे बोलून दाखविले होते असे नाईक यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या गैरप्रकारांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली असून, मतदानापूर्वी रात्रीच्यावेळी कॉंग्रेसतर्फे थैल्या रिकाम्या केल्या जात असल्याने निरीक्षकांनी देखरेख ठेवावी, अशी जाहीर मागणी सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास डॉ.सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments: