नवी दिल्ली, दि. १८ (रवींद्र दाणी): मालेगाव स्फोटांमध्ये साध्वी प्रज्ञाचा सहभाग असता तर ही साध्वी स्फोटानंतर पोलिसांना भेटण्यासाठी जबलपूरहून सुरतला गेली असती काय, ती गेली याचाच अर्थ ती निर्दोष आहे अशा प्रतिक्रिया साध्वीच्या वकिलांनी काल नाशिक न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नोंदविल्या जात आहेत.
साध्वीच्या ८ पृष्ठांच्या २७ परिच्छेदांच्या प्रतिज्ञापत्रातील हा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. साध्वीच्या वकिलांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
७ ऑक्टोबरचा दूरध्वनी
साध्वी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हणते, ७ ऑक्टोबरला मी जबलपूरच्या माझ्या आश्रमात होते. महाराष्ट्र एटीएसमधील एक अधिकारी इन्स्पेक्टर सावंत यांचा मला दूरध्वनी आला. त्यांना माझ्या एलएमएल फ्रीडम मोटार सायकलबाबत माहिती हवी होती. मी ही मोटारसायकल चार वर्षांपूर्वीच विकली असे मी त्यांना सांगितले. माझ्या उत्तरांनी सावंत यांचे समाधान झाले नाही. त्यांनी मला शक्य तितक्या लवकर सुरतला येण्यास सांगितले. कारण सुरतला आम्ही काही वर्षापूर्वी स्थायिक झालो होतो. आश्रम सोडून सुरतला जाणे मला अवघड होते. इन्स्पेक्टर सावंत यांनीच जबलपूरला यावे असे मी सूचविले. पण सावंत यांनी मला सुरतला येण्यास सांगितले.
१० ऑक्टोबरला सुरतमध्ये
इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी मी १० तारखेला सकाळी सुरतमध्ये दाखल झाले. रेल्वेस्थानकावर माझे एक शिष्य भीमभाई परसिचा मला घेण्यासाठी आले होते. मी त्यांच्या घरी गेले. सकाळी १०च्या सुमारास मी इन्स्पेक्टर सावंत यांना भेटले. त्यांनी मला माझ्या मोटारसायकलबाबत विचारले. माझी मोटारसायकल मालेगावमध्ये कशी पोहोचली असा त्यांचा मुख्य प्रश्न होता. माझी मोटारसायकल मी २००४ मध्येच विकली आहे. त्यामुळे ती मालेगावात कशी पोहोचली हे मी कसे सांगणार हे माझे उत्तर होते. माझ्या या उत्तराने सावंत यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी मला महाराष्ट्र एटीएसच्या मुंबई कार्यालयात चलण्यास सांगितले. त्यानुसार मी एटीसच्या मुंबई कार्यालयात गेली.
साध्वीने प्रतिज्ञापत्रावर सांगितलेली ही वस्तुस्थिती पाहता साध्वी मालेगाव प्रकरणात असावी असे अधिकाऱ्यांना वाटत नाही. साध्वीचा सहभाग असता तर ती भाजपशासित मध्यप्रदेशातील जबलपूरहून सुरतला गेलीच नसती. सुरतहून मुंबईला गेली नसती असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात आहे. कोणताही गुन्हेगार असे करणार नाही, पोलिसांचा निरोप येताच तो फरार झाला असता, पण साध्वी फरार तर झालीच नाही उलट ती पोलिसांच्या बोलावण्यावरुन सुरतला गेली. ही एकच बाब मालेगाव प्रकरणात साध्वीचा सहभाग नाही असे मानण्यास पुरेशी आहे असे काही पोलिस अधिकाऱ्यांना वाटते. महाराष्ट्र एटीएस येथेच थांबले असते तर योग्य झाले असते असे या अधिकाऱ्यांना साध्वीच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर वाटत आहे.
Wednesday, 19 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment