Monday, 17 November 2008
दोन विमानांच्या धडकेने हवाई वाहतूक कोलमडली
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) - पर्यटन मोसमाच्या निमित्ताने विदेशी पर्यटकांना घेऊन आलेल्या "ट्रान्झिओर' या विमानाला आज दाबोळी विमानतळावर दोनदा अपघातास सामोरे जावे लागले. सकाळी ८ वा. ३०६ पर्यटकांना घेऊन गोव्यात आलेल्या या विमानावर पक्षी आपटल्याने प्रथम या विमानात तांत्रिक बिघाड झाला, तर त्यानंतर उड्डाणासाठी तयार झालेल्या या विमानाला थॉमस कूकच्या चार्टर विमानाची धडक बसल्याने दोन्ही विमानांची हानी झाली. शिवाय त्यामुळे विमान वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.
ट्रान्झिओर ७४७ हे विमान आज सकाळी उतरत असताना त्यावर पक्षी आपटला. त्यामुळे विमानात बिघाड होऊनही ते धाडसाने विमानतळावर सुखरुप उतरवले. या विमानाची दुरुस्ती होईपर्यंत दुपारचे १.१० वाजले. मग ३०६ पर्यटकांना घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्याला थॉमस कूकच्या ३२० या चार्टर विमानाने पार्किंग वे मध्ये विमान लावत असताना धडक दिली. ट्रान्झिओरचे इंजिन बंद असल्याने यावेळी मोठी दुर्घटना टळली. ही माहिती ट्रान्झिओरचे स्टेशन मास्टर हरपालसिंह यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली. धडक दिलेले विमान जमशेदपूरहून आले होते. या अपघातात दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातामुळे वेळ वाया जाणार हे लक्षात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ट्रान्झिओरमध्ये असणारे काही प्रवासी हे मॉस्कोला जाणारे होते. त्या सर्वांची सोय रॅडिसन कंट्री इन या हॉटेलात करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment