पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- "भारतीय उद्योग महासंघ' (सीआयआय) यांच्यातर्फे "इफ्फी-०८'निमित्त दरवर्षीप्रमाणे "इंडिया- द बिग पिक्चर' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'नवी स्वप्ने, नव्या दिशा' या संकल्पनेवर आधारीत या परिषदेचे २२ नोव्हेंबर रोजी "सिदाद दी गोवा' येथे उद्घाटन होणार आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध देशातील महनीय व्यक्ती या परिषदेत भाग घेणार आहेत.
"सीआयआय'तर्फे भारतीय मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. गोव्यात आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने या उद्योगाशी संबंधित सर्व संबंधितांना एका व्यासपीठावर आणून या उद्योगाला चालना देणे व त्याचबरोबर या उद्योगाच्या विकासासाठीची दिशा ठरवणे आदी गोष्टी या परिषदेमार्फत साध्य केल्या जातात. यावेळी होणाऱ्या परिषदेत मनोरंजन उद्योगातील नवीन शोध, डिजिटल क्रांती, नवे तंत्रज्ञान व मनोरंजन उद्योगातील महसूल प्राप्तीच्या नव्या संधी आदी विषय हाताळले जाणार आहे. भारतीय मनोरंजन उद्योगाला केंद्रबिंदू बनवून या उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठीत स्थान मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याबाबतही चर्चा या परिषदेत होणार आहे.
या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात "सीआयआय' चे गोवा राज्य मंडळाचे माजी अध्यक्ष पी. एफ. एक्स. डिलीमा स्वागतपर भाषण करतील. मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा, मुख्य सचिव जे. पी. सिंग,"युटीव्ही'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉनी स्क्रूवाला,माहिती व प्रसारण सचिव सुषमा सिंग आदी हजर असतील.
पहिल्या सत्रात "मनोरंजन उद्योगातील नव्या उत्पन्नाच्या दिशा' या विषयावर होणाऱ्या चर्चेत रजत बडजात्या, नवीन शहा, प्रीतम डॅनियल, एल.सुरेश, संदीप तर्कस, विशाल कपूर, शशांक जरे, गौतम दत्त सहभागी होतील.
दुसऱ्या सत्रात"नवीन प्रसारमाध्यमे' या विषयावरील सत्रात पीटर मुखर्जी, के.बी.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता सिंग, परमिंदरवीर, हिरेन गडा, तोयीन सुबेर,मोहन कृष्णन, रोहीत शर्मा व विशाल गोंडल हे भाग घेतील. शेवटच्या सत्रात "नव्या बाजारपेठा' या विषयावर चर्चा होईल. त्यात माहिती व प्रसारण खात्याचे संयुक्त सचिव व्ही.बी.प्यारेलाल,बिरेन घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अफलोबी अदेसन्या, राजेश जैन, मनोज श्रीवास्तव, सुप्रान सेन, आशिष भटनागर,उदय शंकर व कृष्णा शहा भाग घेणार आहेत.
Thursday, 20 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment