Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 21 November 2008

डॉ. सुरेश आमोणकर यांच्याविरुद्ध तक्रार

सेव्ह गोवाचे जुझे लोबोंची निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

उत्पन्नाबाबत खोटी माहिती
पुरवल्याचा ठपका
५० लाख रु. आले कोठून?

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना भाजपतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले डॉ. सुरेश आमोणकर यांच्या गोटात मात्र कमालीची निराशा पसरली आहे. डॉ.आमोणकर यांनी आपल्या संपत्तीबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या उत्पन्नाबाबत खोटी माहिती पुरवल्याचा ठपका ठेवून "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा सखोल अभ्यास केला असता सुमारे ५० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत असून हे पैसे कुठून आले,असा सवाल जुझे लोबो यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्यांना आवश्यक कागदोपत्री दस्तऐवजाचीही बळकटी देण्यात आली आहे.

यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार श्री.लोबो यांनी दाखल केलेल्या तक्रारीत डॉ.आमोणकर यांनी लोकप्रतिनिधी व भारतीय दंड संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. आपल्या उमेदवाराबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्ण हक्क मतदारांना असतो.अशावेळी उत्पन्न किंवा इतर आवश्यक गोष्टींबाबत खोटी माहिती पुरवून मतदारांची दिशाभूल करणे गुन्हा ठरत असल्याने त्यानुसार कारवाई करण्यात यावी,असेही या तक्रारीत म्हटले आहे.
"सेव्ह गोवा फ्रंट'पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.आमोणकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पाळी उमेदवारीसाठी मे २००७ मध्ये सादर केलेले उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र व आता ७ नोव्हेंबर २००८ रोजी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यात उत्पन्नाबाबत मोठी तफावत जाणवत असल्याचे म्हटले आहे. गेल्या ११ मे २००७ रोजी डॉ.आमोणकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या साखळी येथील रहिवासी घराचे मूल्यांकन ५,९३,८८२ रुपये केले होते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदर घराचे मुल्यांकन २५,९३,८८२ रुपये केले आहे. गेल्या एका वर्षात सुमारे २० लाख रुपये वाढीव खर्च त्यांनी दाखवला असला तरी या काळात त्यांनी आयकर भरलेला नाही तसेच या काळात त्यांनी कुठे कर्जही घेतल्याचे नमूद केले नसल्याने हे २० लाख रुपये आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतो,असे या तक्रारीत म्हटले आहे. व्यावसायिक मालमत्तेबाबत त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार साखळी येथे ४५.१६ व २४.१२ चौरसमीटर जागांची माहिती दिली आहे. या दोन्ही जागा ११-५-०७ ते ०७-११-०८ या काळात घेण्यात आल्याने त्यांचा समावेश मे २००७ ला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नाही. याबाबतीत अधिक माहिती मिळवली असता ०७-०८ या काळात डॉ.आमोणकर यांनी आयकर भरलेला नसल्याची माहितीही या तक्रारीत दिली आहे. या काळात त्यांनी आयकर भरलेला नाही तसेच त्यांच्या कर्जाची रक्कमही वाढली नाही,अशावेळी त्यांनी विकत घेतलेल्या सदर दोन्ही जागांचे मूल्यांकन ५,५०,००० रुपये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे डॉ.आमोणकर यांनी आपल्या उत्पन्नाबाबत माहिती लपवतानाच आयकर विभागाचीही दिशाभूल केल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. साखळी परिसरातील सध्याचे व्यावसायिक भूखंड बाजारमूल्य २५ हजार रुपये प्रति चौरसमीटर आहे, त्यामुळे डॉ.आमोणकर यांच्या या दोन्ही जागांची किंमत किमान १७,५०,००० हजार रुपये होते. डॉ.आमोणकर यांनी मुळातच आपल्या जमिनींचे मूल्यांकन कमी दाखवण्याची चूक केली आहेच ;परंतु या जागा खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसा कुठून आणला त्याचे स्त्रोतही दिले नसल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही प्रतिज्ञापत्रांचा सखोल अभ्यास केला असता एकूण ५० लाख ५९२ रुपयांचा हिशेब मिळत नसून या उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत प्रतिज्ञापत्रात प्रतिबिंबित होत नसल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. या एकूण प्रकरणाची गंभीर दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व डॉ.आमोणकर यांच्याविरोधात रीतसर तक्रार नोंद करून त्यांच्याविरोधात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई व्हावी,अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.

No comments: