Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 2 October 2008

ईदची सुट्टी आधीच जाहीर करून सरकारने काढले अकलेचे दिवाळे

पणजी, दि. १ (प्रतिनिधी ) : प्रत्यक्षात ईद-उल फित्र उत्सव हा २ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण देशात साजरा होणार असताना राज्य सरकारकडून कोणताही विचार न करता १ ऑक्टोबर रोजी या उत्सवानिमित्ताने "नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट' कायद्याखाली सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे काय, अशा तीव्र प्रतिक्रिया राज्यभरातून उमटल्या.
सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचारी व बॅंक कर्मचाऱ्यांसाठी सुखद ठरला तरी त्यामुळे सामान्य जनता व उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत काही मुस्लीम धर्मगुरूंनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी काढलेल्या पत्रकांत ईद उद्या २ रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विद्यमान सरकारात प्रशासकीय कारभाराचा बोजवाराच उडाल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका आज सर्व थरांतून व्यक्त झाली. ईद- उल फित्र उद्या २ रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. ईद साजरी करणे याचा निकष चंद्रदर्शन हा आहे. त्यावरूनच ईदचा दिवस ठरतो. वास्तविक ३ रोजी ईद साजरी करण्याचे जाहीर झाले होते. तथापि, चंद्रदर्शन २ रोजी होणार असल्याचे निश्चित झाले. २ ऑक्टोबर रोजी गांधीजयंती असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी आहे हे माहीत होते. याच दिवशी ईद असल्याचे जाहीर झाल्यास ही सुट्टी जाणार असल्यानेच सरकारी पातळीवर काही अधिकाऱ्यांनी ३ रोजीची सुट्टी रद्द करून १ ऑक्टोबर रोजी ही सुट्टी जाहीर करून आपला कार्यभाग साधला! ३० सप्टेंबर रोजी बॅंकांना सुट्टी असल्याने त्या दिवशी व्यवहार बंद होते. त्यात १ व २ ऑक्टोबरच्या सुट्ट्या बॅंकांना लागू झाल्याने सतत तीन दिवस बॅंकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. आता शुक्रवार व शनिवार हे दोन दिवस बॅंका उघडणार असल्या तरी क्लिअरिंगवर व्यवहार करणाऱ्या लोकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे,अशी माहिती उद्योजकांनी दिली. बहुतेक सरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सुट्टी असल्याने आपला कार्यक्रम निश्चित केला होता. आता अचानक ही सुट्टी रद्द झाल्याने व १ रोजी सुट्टी मिळाल्याने हे लोक या दिवशी रजा टाकून आपले कार्यक्रम पार पाडणार आहेत.
गोवा चेंबरकडूनही नाराजी
सरकारने १ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीबाबत गोवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फेही नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात ईद गोव्यातही २ ऑक्टोबर रोजी साजरी होत असताना १ रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल चेंबरने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना केलेल्या निषेधपत्रात केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बॅंकांनाही सुटी लागू होणार असल्याने त्यामुळे राज्यातील उद्योजक व व्यावसायिकांची मोठीच गैरसोय होणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. वास्तविक गेल्या आठवड्यात २४ व २५ रोजी संपामुळे बॅंका बंद होत्या. त्यात ३० रोजी सहामाही हिशेबांमुळे बॅंकांचे व्यवहार बंद होते. त्यात आता १ व २ रोजी या सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहणार असल्याने सर्व बॅंक व्यवहारच ठप्प होणार असल्याचेही चेंबरने म्हटले आहे. व्यावसायिक व उद्योजकांचे व्यवहार हे "क्लिअरिंग' पद्धतीवर चालत असल्याने या सततच्या सुट्ट्यांमुळे हे गणितच बिघडल्याने धनादेश न वठल्याने त्यांना दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, सरकारने निदान यापुढे तरी असले निर्णय घेताना सारासार विचार करावा असा सल्लाही या पत्रात देण्यात आला आहे.
----------------------------------------------------
भोंगळ कारभाराचा नमुना
देशभर ईद २ ऑक्टोबर रोजी साजरा होत असताना १ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची सरकारची कृती हा या सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुनाच असल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. ईदची सुट्टी हवीच; परंतु निदान ती उत्सवादिवशी असणे गरजेचे होते. राज्य सरकारने १ ऑक्टोबर रोजी कसली सुट्टी जाहीर केली ते मात्र कळायला मार्ग नाही,असा टोलाही त्यांनी हाणला.

No comments: