Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 3 October 2008

कॅसिनोविरोधात धरणेप्रसंगी सरकारच्या धोरणाचे वाभाडे

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : प्रदेश कॉंग्रेस पक्षातर्फे यंदा पहिल्यांदाच गांधीजयंती निमित्ताने मतदारसंघनिहाय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गांधीजींच्या नावाने समाजसेवेचे वेड पांघरणाऱ्या याच पक्षाच्या सरकारकडून त्यांच्याच विचारांना तिलांजली देऊन कशा पद्धतीने समाजविघातक गोष्टींचे लांगूलचालन सुरू आहे, याचा पर्दाफाश आज "ऊठ गोंयकारा'संघटनेतर्फे कॅसिनोविरोधात धरणे कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
"ऊठ गोंयकारा'संघटनेतर्फे येथील कॅप्टन ऑफ पोर्टस जेटीसमोर कॅसिनोविरोधात धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास विविध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केल्याने या कार्यक्रमाला जोमदार प्रतिसाद लाभला. "कॅसिनोविरोधी आम आदमी,औरत',राज्य शिवसेना,दोनापावला नागरिक मंच,गोवा पीपल्स फोरम आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या धरणे कार्यक्रमात सहभागी होऊन सरकारच्या कॅसिनोविषयक धोरणाचा जाहीर निषेध केला. गांधीजींच्या नावाचा उल्लेख करून व्यासपीठावरील भाषणे ठोकणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी कॅसिनोसारख्या जुगारांना गोव्यात आमंत्रित करून काय चालवले आहे, याचे उत्तर द्या,असा खडा सवाल संघटनेचे निमंत्रक अमोल नावेलकर यांनी केला. पर्यटन हा राज्याच्या आर्थिक कणा असला तरी त्यासाठी गोवा हे जुगार वा वेश्याव्यवसायाचे केंद्र अशी जाहिरात करून सरकार कोणत्या पर्यटकांना गोव्यात आकर्षित करू पाहत आहे,असा सवालही करण्यात आला. दोनापावला नागरिक मंचचे आनंद मडगावकर यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोणताही विचार न करता मांडवी नदीत कॅसिनो जुगारी जहाजांना परवाना देणे म्हणजे गोवा नष्ट करण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. येथील भावी युवा पिढीला जुगाराची व वेश्यागमनाची चटक लावून सरकार काय साधू पाहत आहे,याचा जाब नागरिकांनी विचारावा असेही ते म्हणाले.
विविध ठिकाणी मेगा प्रकल्पांना हमखास परवाना देऊन संपूर्ण गोव्याचा नाश करण्याचा विडाच विद्यमान सरकारने उचलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गजानन नाईक,रघुवीर वेर्णेकर,श्रीकृष्ण वेळुस्कर,ऍड.सतीश सोनक,बायलांचो साद संघटनेच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स आदींची भाषणे झाली. जोपर्यंत कॅसिनो बंद होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.
दरम्यान, राज्यात सर्वत्र चोऱ्या व दरोड्यांचे सत्र सुरू असताना या धरणे कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जो फौजफाटा पुरवण्यात आला होता तो केवळ कॅसिनो उद्योजकांना संरक्षण पुरवण्यासाठी होता अशी टीकाही यावेळी करण्यात आली. ऍड.जतीन नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
------------------------------------------------------
जाहिरात फलक झाकला
कॅप्टन ऑफ पोर्टस जेटीच्या आत कॅसिनोची जाहिरात करणारा लावलेला फलक या धरणे कार्यक्रमामुळे पूर्णपणे झाकण्यात आला होता. या फलकावर काळा पडदा टाकून जणू सरकारने आपले काळे कृत्य लपवण्याचा केलेला प्रयत्नच होता, अशी टीका आंदोलकांनी केली.

No comments: