Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 1 October 2008

बसमालकांचा 'बंद' मागे, नवे तिकीटदर आजपासून अमलात

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने कारवाईचा बडगा उगारताच खाजगी बस मालक संघटनेने घोषित केलेला लाक्षणिक "बंद' आज मागे घेतला. "बंद'मध्ये सामील होणाऱ्या बसमालकांवर दंडात्मक कारवाईसह परवाना रद्द करण्याचा इशारा वाहतूक खात्याने दिला. त्यामुळे बंद मागे घेण्याची नामुष्की खाजगी बसमालकांवर ओढवली. त्याचबरोबर राज्य सरकारने तिकीट दरवाढीबाबतची अधिसूचना आज जारी केल्याने नवे तिकीट दर उद्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
राज्य वाहतूक प्राधिकरणाने बस तिकीट भाडेवाढीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून खाजगी बसमालक संघटनेने उद्या १ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक बंद पुकारला होता. मात्र, लोकांची गैरसोय करून मागण्या पुढे रेटण्याची संघटनेची मागणी धुडकावून लावत योग्य पद्धतीने मागण्या सादर केल्यास त्याबाबत विचार करू,असा प्रस्ताव वाहतूक संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी बस मालकांपुढे ठेवला. तो संघटनेने मान्य केला. हा बंद मोडून काढण्याची सर्व तयारी वाहतूक खात्याने ठेवली होती,असे रेड्डी यांनी सांगितले.
लाक्षणिक बंदच्या पार्श्वभूमीवर श्री. रेड्डी यांनी आज खाजगी बसमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले. यावेळी त्यांच्या मागण्यावर चर्चा झाली. दरम्यान,उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रेड्डी यांनी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांवर गंभीरपणाने विचार करू,असे आश्वासन दिल्यानंतरच "बंद' मागे घेण्यात आला.
सरकारने तिकीट दरवाढीबाबतची अधिसूचना स्थगित ठेवावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. मात्र ती जारी केल्याची माहिती मिळाल्याने सरकारकडून संघटनेची मस्करी तर सुरू नाही ना,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावावर जर खरोखरच गंभीरपणाने विचार झाला नाही तर मात्र रस्त्यावर उतरावेच लागेल,असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान,खाजगी बसमालकांकडून तिकीट दरवाढीबाबत मागणी करण्यात आली तरी त्यांच्याकडून प्रवाशांना कोणत्या सुविधा दिल्या जातात,असा सवाल श्री.रेड्डी यांनी केला. बसेस खचाखच भरणे,वेळेचे बंधन न पाळणे,शनिवार व रविवारी गाड्या बंद ठेवणे, प्रवाशांना तिकीट न देणे आदी प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने ते ताबडतोब बंद झाले नाहीत तर यापुढे कठोर कारवाई करण्याचे संकेत रेड्डी यांनी दिले.
-------------------------------------------------------------
किमान भाडे आता पाच रुपये
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या पाच किलोमीटरसाठी आता किमान भाडे ५ रुपये असेल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे ४५ पैसे आकारले जातील. सिटी बसेससाठी पहिल्या ३ किलोमीटरला ४ रुपये, तर पुढील किलोमीटरसाठी ५० पैसे आकारले जातील. बसमालक संघटनेच्या मते पहिल्या तीन किलोमीटरसाठी ५ रुपये व नंतर प्रत्येक किलोमीटरवर ४५ पैसे वाढ दिल्यास ती त्यांना मान्य असेल,असे सांगण्यात आले.

No comments: