Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 28 September 2008

युवाशक्तीपुढे सपशेल नमते घेऊन विद्यार्थी मंडळ बरखास्तीला विद्यापीठाची अखेर स्थगिती


पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाच्या युवाशक्तीने धारण केलेला जमदाग्नीचा अवतार, दोघा अधिकाऱ्यांना घातलेला घेराव, गगनभेदी घोषणा आणि जुलमी आदेशाविरुद्ध विचारलेला जाब यापुढे सपशेल नमते घेऊन गोवा विद्यापीठाने अखेर आज विद्यार्थी मंडळ बरखास्तीच्या आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली. काल अचानकपणे ही निवडणूक प्रक्रियाच विद्यापीठाने बेकायदा ठरवली होती.
गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळ निवडणुकीत भाजप विद्यार्थी मंडळाने दणदणीत विजय संपादन केला होता. त्या निर्णयाची शाई वाळलीही नव्हती; तोवरच काल विद्यापीठाने विद्यार्थी मंडळ बरखास्तीचा निर्णय अचानकपणे घेतला होता. त्यामुळे भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती.
विद्यार्थी मंडळ निवडणुकीचे हे प्रकरण विद्यापीठ कार्यकारी मंडळासमोर ठेवण्यात येणार असून या मंडळाचा निर्णय अंतिम असेल, असे प्रभारी कुलगुरू प्रा. ए. व्ही. आफोन्सो यांनी सांगितले.
दरम्यान,आज सकाळी सुमारे अकरा वाजता शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी भाजप युवा मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठावर मोर्चा नेला. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.मोहन सांगोडकर व प्रभारी कुलगुरू प्रा.आफोन्सो यांना या आदेशाबाबत जाब विचारला असता त्यांनी चकार शब्द बोलण्यास नकार दिला. यावेळी तब्बल तीन तास या दोघाही अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवण्यात आले. विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव त्यांनी केली, पण ती ऐकून घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. भाजप विद्यार्थी मंडळ रद्द करण्याचा जुलमी आदेश तात्काळ रद्द करा ही एकमेव मागणी लावून धरताना युवाशक्तीने तेथे ठिय्याच दिला. यावेळी तेथे उपस्थित पोलिसांनीही यात हस्तक्षेप करून चर्चेअंती तोडगा काढण्याचे प्रयत्न केले नाहीत. विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी एकही अधिकारी तिथे पोहचला नाही. याप्रकरणी चौकशी केली असता तशी सूचना या दोघा अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तब्बल तीन तास मागणी करूनही जेव्हा चकार शब्द काढण्याचे टाळण्यात आले तेव्हा अखेर वीस मिनिटांचा शेवटचा अवधी निर्णयासाठी देण्यात आला; अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांना विद्यापीठ जबाबदार ठरेल,असा इशारा विद्यार्थी विभागाचे निमंत्रक आत्माराम बर्वे यांनी दिला. अखेर प्रा.आफोन्सो यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून सदर वादग्रस्त आदेश स्थगित ठेवण्याचे घोषित केले. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेची फाईल विद्यापीठ कार्यकारी मंडळासमोर ठेवण्यात येणार असून अंतिम निर्णय ते घेणार असल्याचे सांगताच अखेर हा निर्णय मान्य करून विद्यार्थ्यांनी त्यांची सुटका केली.
विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. बाळकृष्ण कानोळकर यांनी निवडणूक अधिकारी या नात्याने केलेली प्रक्रिया पूर्णपणे बेकायदा असल्याचे प्रा.अफोन्सो म्हणाले. प्रत्यक्षात निवडणूक पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यापूर्वीच ही प्रक्रिया नव्याने सुरू करणे गरजेचे होते व त्यात विद्यापीठाची यंत्रणा अपयशी ठरली, असेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान, तब्बल तीन तास सुरू राहिलेल्या या नाट्यात या दोन्ही अधिकाऱ्यांनी मौन धारण केल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढत गेला. शिक्षकांनी आपल्या कृतीतून स्वाभिमान प्रदर्शित करणे गरजेचे आहे; परंतु राजकीय इशाऱ्यानुसार वागण्याची त्यांची कृती खेदजनक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणांनी पूर्ण विद्यापीठच दुमदुमून टाकले.
विद्यार्थ्यांकडून कायदा हातात घेण्याची वाटच जणू हे अधिकारी पाहत होते काय,असा सवालही यावेळी करण्यात आला. आंदोलक विद्यार्थ्यांनी तेथे फक्त घोषणा व नारेबाजी केली. विद्यापीठाच्या मालमत्तेला त्यांच्याकडून कोणतीही हानी पोहोचवली गेली नाही. उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांनी डॉ.सांगोडकर यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्याशी चर्चा केली व नंतर ते तेथून निघून गेले. सर्व नाट्य संपल्यावर पणजीचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी अजित पंचवाडकर तेथे पोहचले. यावेळी रूपेश महात्मे,शर्मद रायतूरकर,युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष शिरोडकर,दीपक नाईक,दीपक कळंगुटकर आदी नेत्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

No comments: