Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 28 September 2008

विद्यार्थी मंडळ बरखास्ती हे कॉंग्रेसचे घाणेरडे राजकारण: पर्रीकर यांची घणाघाती टीका

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): लोकशाही पद्धतीने झालेल्या विद्यापीठ निवडणुकीत भाजप विद्यार्थी मंडळाचे पॅनेल विजयी झाल्याची घोषणा झाल्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी निवडणूकच रद्दबातल ठरवण्याची कृती म्हणजे कॉंग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचाच एक भाग असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज येथील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. कॉंग्रेसच्या या रडीच्या डावामुळेच विद्यापीठाने हा अन्यायकारक निर्णय घेतला असून तो मागे घेतला नाही तर योग्य ते उत्तर देऊ,असा इशाराही पर्रीकर यांनी यावेळी दिला. लोकशाहीविरोधी पद्धतीने सत्ता हस्तगत करण्याची कॉंग्रेसची परंपराच आहे. विद्यमान दिगंबर कामत सरकार अशाच पद्धतीने सत्तेला चिकटून असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पहिल्या खेपेस अल्पमतात आल्यानंतर दोघा आमदारांना अपात्र ठरवण्याची कृती केली गेली, तर दुसऱ्यावेळी अल्पमतात आल्यावर राज्यपालांतर्फे विधानसभा अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रकार घडला. हा कॉंग्रेसच्या नीतिहीन राजकारणाचाच भाग असल्याचे ते म्हणाले. आता विद्यार्थ्यांनाही कॉंग्रेसचे हे राजकारण कळणार असल्याने राज्याच्या भावी पिढीला राजकीय दिशा ठरवण्याच्या दृष्टीने ते योग्य होईल,असे पर्रीकर म्हणाले.
विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेत घोळ होत असल्याच्या तक्रारी दोन्ही गटांनी केल्या असताना त्यावेळीच ही प्रक्रिया रद्द का करण्यात आली नाही? आता भाजप विद्यार्थी मंडळ विजयी झाल्याने अचानक चौकशी समिती नेमून निवडणूकच रद्दबातल ठरवण्याचा अधिकार संबंधितांना कोणी दिला,असा खडा सवालही पर्रीकर यांनी उपस्थित केला.कॉंग्रेसने "एनएसयुआय'मार्फत पैशांची आमिषे व दबाव टाकून विद्यापीठावर वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यात ते अपयशी ठरल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला.
आज विद्यार्थी मंडळाने या अन्यायाविरोधात केलेल्या आंदोलनामुळे निवडणूक रद्द करण्याचा आदेश स्थगित ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला. तथापि,भाजप विद्यार्थी मंडळावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडला जाईल,अशा इशाराही त्यांनी दिला.

No comments: