नवकथेचा जनक हरपला
मुंबई, दि.१५ : मराठी लघुकथेला वेगळे वळण देऊन नवकथेचे शिल्पकार ठरलेले साहित्यिक आणि अर्थतज्ज्ञ प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८५ वर्षे होते.
वांद्रे येथील साहित्य सहवासमधील घरीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिव येथील स्मशानभूमीत दुपारी त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला.
गाडगीळांचे कनिष्ठ बंधू पत्रकार मिलिंद गाडगीळ यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. तेही आर्थिक व संरक्षणविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध होते.
मूळत: अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या प्रा. गाडगीळांनी मराठी लघुकथेच्या क्षेत्रात अधिकाराने संचार केला आणि ख्याती प्राप्त केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक असतानाही त्यांची ओळख लघुकथाकार, नव्हे नवकथाकार अशीच झाली होती.
प्रारंभी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक राहिलेले गाडगीळ हे नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे संस्थापक प्राचार्य झाले. नंतर आपटे-वालचंद उद्योगसमूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. आवर्जून मराठीत अर्थविषयक वृत्तपत्रीय लिखाण, हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले.
त्यांच्या "भिनलेले विष' या कथेला १९५४ साली न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्यूनचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना राज्य सरकारचा वाड्.मय पुरस्कारही तीन वेळा प्राप्त झाला. १९९६ मध्ये त्यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावला. "एका मुंगीचं महाभारत' या दोन भागांतील आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमीने त्यांना गौरविले होते.
गाडगीळांनी लिहिलेल्या अनेक लघुकथा गाजल्या. विशेषत: तलावातले चांदणे ही कथा प्रचंड गाजली. तशीच गाजली लोकमान्य टिळकांवरील "दुर्दम्य' ही कादंबरी. बंडू हा नायक कल्पून त्यांनी बरेच लेखन केले व ते लोकांना आवडलेही. लघुकथा, प्रवासवर्णने, समीक्षा, अर्थकारण, बालसाहित्य असे विविध विषयांवर विपुल लिखाण त्यांनी केले. त्यांचे बरेचसे साहित्य इंग्रजी, हिंदी, कानडी व मल्याळी भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. प्रा. गाडगीळ हे सामाजिक कार्यकर्तेही होते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. किंबहुना, ग्राहक चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे या नात्याने ते प्रणेतेच होते, अशी शोकसंवेदना माजी केंद्रीय मंत्री व भाजपानेते राम नाईक यांनी व्यक्त केली.
परंपरागत पठडीतून मराठी कथेला मुक्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणारे साहित्यिक हरपल्याची भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळातील युगाच्या जाणिवा मराठी कथेत आणण्यात गाडगीळ यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
Tuesday, 16 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment