Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 14 September 2008

आम. दिलीप परुळेकरांना अपात्र ठरवण्याची मागणी

पणजी, दि.१३(प्रतिनिधी): बाबूश मोन्सेरात यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वादंग सुरू असताना आता माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांनी साळगावचे भाजप आमदार दिलीप परूळेकर यांनीही निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत साळगाव मतदारसंघातून पहिल्यांदाच पराभूत झालेले डॉ. विली यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार दिलीप परूळेकर यांचा आता पिच्छा पुरवण्यास सुरुवात केली आहे. आमदार परूळेकर यांनी निवडणूक आयोगाकडे आपली माहिती देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ. विली यांनी केला आहे. स्थावर मालमत्तेची माहिती देताना त्यांनी आपल्या मालकीच्या कोणत्याही आस्थापनाची माहिती दिलेली नाही; परंतु करांची माहिती देताना व्यावसायिक कर भरत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परूळेकर यांचे दुकान भक्ष्यस्थानी पडले होते. या दुर्घटनेबाबत अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने केलेल्या पंचनाम्यानुसार हे दुकान त्यांच्या मालकीचे आहे,असे म्हटले आहे. या दुकानाचा विमाही त्यांनी आपल्या नावावर उतरवला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदार या नात्याने अग्निशमन दल संचालनालयाला पत्र पाठवून आपल्या दुकानाच्या पंचनाम्याबाबत लेखी व्यवहारही केला आहे,असे डॉ.विली यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारांत या दुकानाची कोणतीही माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केली नाही,असा दावा त्यांनी केला.
दिलीप परूळेकर यांनी निवडणूक अर्ज भरताना शैक्षणिक पात्रतेबाबत प्रतिज्ञापत्र सादरच केले नाही,अशी टीका डॉ.विली यांनी केली. साळगाव मतदारसंघाचे एक मतदार ज्योकीम अग्नेलो डायस यांनी माहिती हक्क कायद्याव्दारे त्यांच्या निवडणूक अर्जाची संपूर्ण माहिती मागितली असता या माहितीतून शैक्षणिक पात्रतेचे प्रतिज्ञापत्रच गायब असल्याचे डॉ. विली म्हणाले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे शैक्षणिक प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे उघड होते व जर का त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला अर्धवट माहिती देण्यात आल्याचे सिद्ध होईल असेही डॉ. विली यांनी म्हटले आहे. याप्रकरणी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी ज्योकीम डायस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याबाबत चौकशीचा आदेश गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. याप्रकरणी पुढे काय झाले याबाबत मात्र काहीच माहीत नसल्याचे डॉ. विली म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश देऊनही राज्य प्रशासन काहीही कृती करीत नसल्याने त्यांनी प्रशासकीय कारभारावरही टीका केली. जर येत्या काही दिवसांत याप्रकरणी कारवाई झाली नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा डॉ. विली यांनी दिला.
--------------------------------------------------------
ही वृद्धत्वाची लक्षणेः दिलीप परूळेकर
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षे राजकारणात असलेले व खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री बनलेल्या डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांना साळगाववासीयांनी पराभूत केल्याने त्यांचा उतारवयात तोल ढळला आहे,असा टोमणा साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांनी हाणला. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप व आपल्या अपात्रतेची केलेली मागणी ही त्यांच्या वृद्धत्वाची स्पष्ट चिन्हे असल्याचा शेराही त्यांनी मारला.
डॉ. विली नमूद करीत असलेले दुकान आपण चालवतो ही गोष्ट खरी असली तरी ती जागा आपल्या मालकीची नाही. सेरूला कोमुनिदादच्या मालकीची ही जागा करारपद्धतीने आपण घेतली असून तिथे आपण व्यवसाय करतो. या दुकानाचा व्यवसायिक कर आपण भरतो. तसेच तेथील सामान हे आपल्या मालकीचे असल्याने त्याचा विमाही आपल्या नावावर असणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करावयाच्या अर्जात स्थावर मालमत्तेची मालकी याबाबत माहिती मागितली होती. या दुकानाची मालकी आपली नसल्याने तिथे आपले नाव असण्याची गरजच काय,असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबतचे प्रतिज्ञापत्र आपण सादर केल्याचा दावा करून ते सादर केले नाही,असा आरोप करणारे डॉ. विली यांना अजूनही आमदारकीची स्वप्ने पडत असावीत,अशी खिल्लीही त्यांनी उडवली. आजपर्यंत आपल्या इशाऱ्यावर राजकीय सूत्रे हलवण्याची सवय जडलेल्या डॉ. विली यांच्या हातातील ही सूत्रेच नाहीशी झाल्याने घोड्याविना रथात बसलेल्या सारथ्यासारखी त्यांची अवस्था बनली आहे, असेही श्री. परुळेकर म्हणाले.

No comments: