Saturday, 20 September 2008
दिल्लीत 'हुजी'च्या दोन अतिरेक्यांना टिपले
दोन पळाले; एकाला जिवंत पकडले
पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद
एकूण ३ संशयित अतिरेकी पोलिसांच्या ताब्यात
दोन एके-४७ रायफली आणि एक पिस्तुल जप्त
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
अहमदाबाद व दिल्लीतील स्फोटांशी संबंध
चकमकीनंतर जामियानगर भागात प्रचंड तणाव
चकमक बनावट असल्याचा आरोप
उपायुक्त धालिवाल यांनी आरोप फेटाळला
नवी दिल्ली, दि.१९ : राजधानी दिल्लीतील ओखला भागांतर्गत येणाऱ्या जामिया नगरमध्ये आज पोलिसांच्या विशेष पथकासोबत झालेल्या चकमकीत "हुजी'चे दोन अतिरेकी ठार झाले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले. दोन अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले. चकमकीनंतर आणखी दोन संशयित अतिरेक्यांनाही पोलिसांनी अटक केली असून, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित अतिरेक्यांची संख्या तीन झाली आहे. या चकमकीत जखमी झालेले पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे शहीद झाले असून, हवालदार बलवंत गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही माहिती दिल्लीचे सहपोलिस आयुक्त कर्नलसिंह यांनी घटनेनंतर लगेच पत्रकारांशी बोलताना दिली.
अहमदाबाद स्फोटांमागील "मास्टरमाईंड' अबु बशर याला गुरुवारी अहमदाबाद येथून दिल्लीला नेण्यात आले होते. तिथे त्याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने आज सकाळी ओखला भागातील जामियानगरमधील खलिलुल्लाह मशिदीजवळ असलेल्या एका इमारतीवर छापा घातला. मात्र, आजच्या चकमकीचा आणि अबु बशरच्या चौकशीचा काही संबंध नसल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त वाय. एस. दडवाल यांनी म्हटले आहे. पोलिस जामियानगर भागात शोधासाठी गेले असता, सदर इमारतीत अतिरेकी असल्याचे समजल्यावरून कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्या इमारतीमध्ये अतिरेकी लपून बसले होते, त्या इमारतीला गराडा घातल्यानंतर पोलिसांनी सर्व अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केले. परंतु, शरण येण्याऐवजी अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात आधी एक अतिरेकी ठार झाला, तर काही वेळातच दुसरा ठार झाला.
दोन तास चाललेल्या या चकमकीत दोन अतिरेक्यांना ठार मारल्यानंतर पोलिसांनी एकाला जिवंत पकडले, तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. जामियानगर भागात लहानलहान गल्ल्या असल्याने त्यांचा फायदा घेत हे अतिरेकी पळाले. त्यांना पळून जाताना पोलिसांनीही पाहिले. परंतु, पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, पळून गेलेल्या अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे.
विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वात सकाळी पोलिसांनी जामियानगर मशिदीजवळ असलेल्या एल-१८ क्रमांकाच्या इमारतीला वेढा घातला. ११ वाजता सुरू झालेली चकमक १ वाजता संपली. यात मोहनचंद्र शर्मा यांच्या पोटात गोळी घुसली. या इमारतीत अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी ही कारवाई केली.
अबु बशरने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस तौकीर अहमद याच्या शोधात होते. त्याला शोधत असतानाच या पाच अतिरेक्यांची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यापैकी दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात व एकाला जिवंत पकडण्यात पोलिस यशस्वी झाले. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर अवघ्या सहा दिवसांत पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे.
विशेष म्हणजे अबु बशरही जेव्हा दिल्लीत आला होता, तेव्हा तो याच जामियानगरमधील एल-१८ या इमारतीत राहिला होता. अतिरेकी लपून बसू शकतात अशा तीन ठिकाणांची माहिती त्याने दिली होती. त्या आधारावर पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई केली. इमारतीत दडलेल्या पाचपैकी दोघांना ठार मारल्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्यानंतर आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पकडण्यात आलेल्या संशयित अतिरेक्यांची संख्या तीन झाली आहे.
राजधानी दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. स्फोटांचा साक्षीदार असलेल्या १२ वर्षीय बालकालाही गुरुवारीच संरक्षण देण्यात आले होते.
आज सकाळी झालेल्या चकमकीनंतर दिल्लीत सुरक्षा आणखी वाढविण्यात आली असून, बॉम्बशोधक व निकामी करणाऱ्या पथकालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
चकमक झाली, त्या ठिकाणाहून पोलिसांनी एक एके-४७ रायफल आणि एक पिस्तुल जप्त केले आहे. आतिक उफ बशिर उफ फक्रुद्दिन असे ठार मारण्यात आलेल्या एका अतिरेक्याचे नाव असून, दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पकडण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव सैफ असल्याचे समजते.
चकमक सुरू झाली, त्यावेळी जामियानगर भागात प्रचंड गर्दी झाली होती. मोहनचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वातील पथकाने इमारतीला घेराव घालताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि इमारतीची नाकाबंदी करण्यात आली. सर्व नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून घरातच राहण्यास सांगण्यात आले आणि जे बाहेर होते, त्यांना पांगविण्यात आले. काय होत आहे हे नागरिकांना कळण्याच्या आत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.
रमजानचा महिना सुरू असल्याने आणि घटनास्थळ खलिलुल्लाह मशिदीजवळच असल्याने त्याठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. परंतु, घटनास्थळापासून सर्वांना दूर करण्यात आले होते. अतिरेकी इमारतीच्या चवथ्या माळ्यावर होते आणि गल्लीही अरुंद होती. त्यामुळे कारवाई करणे पोलिसांना थोडे कठीणच जात होते.
चकमक बनावट असल्याचा रहिवाशांचा दावा
दरम्यान, आज सकाळी झालेली चकमक बनावट असल्याचा दावा जामियानगरमधील नागरिकांनी केला आहे. ज्या इमारतीत अतिरेकी दडले होते असा पोलिसांचा दावा आहे, त्या इमारतीतून गोळीबार झालाच नाही, असे त्यांचे म्हणणे असून, पोलिस विनाकारण आम्हाला "टार्गेट' करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ज्या इमारतीत अतिरेकी लपले होते, ती इमारत मशिदीच्या अगदी जवळ आहे आणि रमजानचा महिनाही चालू आहे. त्यामुळे चकमकीनंतर मोठ्या प्रमाणावर जमाव तिथे जमला आणि प्रचंड तणाव निर्माण झाला. आम्हीही दहशतवादाच्या विरोधात आहोत, मग आमच्या धार्मिक ठिकांणांना लक्ष्य का केले जाते, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मात्र, चकमक बनावट असल्याचा जामियानगरवासीयांचा दावा दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त एच. जी. एस. धालिवाल यांनी फेटाळून लावला आहे. चकमकीसाठी कोणत्याही धार्मिक स्थळाचा वापर करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केली.
इमारतीतून गोळीबार झालाच नाही, पोलिसांनीच गोळीबार करून दोघांना ठार मारले अशी अफवा पसरल्याने तणाव वाढला. परंतु, ज्या इमारतीत चकमक झाली, त्याच्या शेजारी राहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी मात्र आधी इमारतीतून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिस आमच्या भागात आले आणि काही वेळातच इमारतीतून गोळ्यांचा आवाज ऐकू आला. आम्ही दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा आवाज ऐकला, असे त्यांनी सांगितले.
एका दूरचित्रवाहिनीचा प्रतिनिधी आपल्या वाहिनीला बातमी कळवित असतानाच एक मुस्लिम नागरिक त्याच्या माईकजवळ येऊन जोरजोरात ओरडत होता. मुसलमानांना विनाकारण बदनाम केले जात असल्याचे त्याचे म्हणणे होते.
दिल्ली स्फोटांशी संबंध
आज झालेल्या चकमकीत ठार झालेला आतिक आणि त्याचा साथीदार(ओळख पटलेली नाही) या दोन्ही अतिरेक्यांचा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग होता, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त वाय. एस. दडवाल यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
आज ठार मारण्यात आलेले दोन्ही अतिरेकी आझमगडचे राहणारे होते. दिल्लीच्या स्फोटातील प्रमुख संशयित तौकीर अहमद याच्याशी या दोघांचे खास संबंध होते आणि तौकीरनेच दिल्ली स्फोटांची योजना आखली होती, असेही दडवाल यांनी सांगितले.
-----------------------------------------
निघड्या छातीचा पोलिस अधिकारी
राजधानी दिल्लीतील जामियानगर भागात आज अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेले दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील निरीक्षक मोहनचंद शर्मा यांचे सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू होते.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मोहनचंद शर्मा यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक अतिरेक्यांच्या शोधात जामियानगर भागात गेले असता, एका इमारतीत दडून बसलेल्या अतिरेक्यांसोबत त्यांची चकमक सुरू झाली. शर्मा यांच्यासोबत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी शौर्य दाखवत आघाडी सांभाळली. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शर्मा यांना चार गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. लगेचच त्यांना होली फॅमिली रुग्णालयात हलविण्यात आले.
परंतु, रात्री सातच्या सुमारास देशासाठी लढणाऱ्या या शूर जवानाचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोटांनी देश हादरविणाऱ्या अतिरेक्यांशी लढतालढता मोहनचंद शर्मा शहीद झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला दु:ख झाले असून, राष्ट्रभावनेने लढलेल्या या वीराला देशाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मोहनचंद शर्मा यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या करीअरमध्ये देशद्रोही कारवाया करणाऱ्या ४० अतिरेक्यांना ठार मारले असून, त्यांना विशेष कामगिरीबद्दल ७ वेगवेगळे पुरस्कारही प्राप्त झाले होते. एक धाडसी, शूर अधिकारी म्हणून दिल्ली पोलिसात त्यांची ख्याती होती.
अतिरेक्यांना हुडकून काढण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या शर्मा यांचा मुलगा डेंग्युच्या तापाने आजारी असून, त्याच्यावरही एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरची काळजी न करता अतिरेक्यांशी लढणारे शर्मा यांना आज वीरगती प्राप्त झाल्याने पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सायंकाळी शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली. शर्मा हे देशासाठी शहीद झाल्याचे कळताच त्यांनीही दु:ख व्यक्त केले आणि शर्मा यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. सरकारच्या वतीने शर्मा यांच्या परिवाराला जेवढी मदत करता येणे शक्य आहे, ती सर्व करण्याचा प्रयत्न करू, असेही शिवराज पाटील यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारकडून ५ लाख रुपये
दरम्यान, अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या मोहनचंद शर्मा यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment