Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 8 May 2008

दक्षिण गोव्यामधील शाळा प्रवेशास स्थगिती देणग्यांच्या आरोपानंतर आदेश : सोमवारी खास बैठक

मडगाव,दि.८ (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळांत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या घेतल्या जातात या फातोर्डा नागरी कल्याण समितीने येथील विभागीय साहाय्यक शिक्षण संचालकांकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल शिक्षण खात्याने घेऊन शिक्षण संचालकांनी आज दक्षिण गोव्यातील सर्व शाळांतील प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. यासंदर्भात येत्या १२ मे रोजी फातोर्डा नागरी कल्याण समितीची बैठक दक्षिण गोवा साहाय्यक शिक्षण संचालकांबरोबर बोलावण्यात आली आहे.
आज या नागरी कल्याण समितीने साहाय्यक शिक्षण संचालक बी. जी . नाईक यांना त्यांनी मागितलेला शाळा प्रवेश प्रक्रियेबाबतचा तपशील न मिळाल्याबद्दल घेराव घातला. नाईक यांनी पणजीहून तपशील आला नसल्याची सबब सांगितली. तथापि, ती समितीने अजिबात मान्य केली नाही. तसे असेल तर संचालकांना बोलावण्याचा आग्रह समितीने धरला. समितीने अडीच ते तब्बल तीन तास तेथे ठिय्या दिलेला पाहून नाईक यांनी "सायबरएज' कार्यक्रमासाठी मडगावात असलेले शिक्षण उपसंचालक अनिल पवार यांच्याशी संपर्क साधला व ते मल्टिपर्पजमधील कार्यक्रम आटोपता घेऊन शिक्षण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी निदर्शकांची भेट घेऊन सरकारची बाजू पटविण्याचा प्रयत्न केला, पण निदर्शक बधत नाहीत हे पाहून नंतर त्यांना दक्षिण गोव्यामधील शाळांतील प्रवेश प्रक्रियेचा तपशील देण्यात आला.
यावेळी नागरी समितीला दिलेल्या लेखी हमीत प्रवेश व त्यासाठीच्या देणग्यांचा प्रश्न १२ मेपर्यंत सोडवला जाईल व याकामी शिक्षण संचालकांनी आधीच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
फातोर्डा नागरी कल्याण समितीबरोबर दक्षिण गोवा शिक्षण उपसंचालकांची पुढील बैठक १२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीस शिक्षण संचालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अधिकृत माहिती नुसार द. शिक्षण विभागाने मडगावातील एकूण सहा प्रमुख शाळांतील प्रवेश प्रक्रियेचा तपशील आपला खास प्रतिनिधी पाठवून गोळा केला बऱ्याच शाळांतील पध्दतीत विसंगती आढळली. काहींनी प्राथमिक वर्गासाठी फी आकारताना निर्धारीत पध्दती अवलंबिली नसल्याचे तर काहींनी वर्गाचे गट पाडताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. एका नामवंत संस्थेने विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रमाणात रक्कम गोळा केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. तेकरताना व्यवस्थापनाने खात्याची परवानगी घेतली नाही की हिशेबही सादर केला नसल्याचे यावेळी आढळून आले.

No comments: