Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 5 May 2008

तिळामळ केपे येथे तणाव
जमावाचा पोलिसांवर हल्ला
निरीक्षकासह पाच पोलिस जखमी
चर्च परिसरात दोन गटांत मारामारी
पोलिसांच्या व्हॅनची मोडतोड

परिस्थिती नियंत्रणाखाली
केप्यात कडेकोट बंदोबस्त

सध्या केपे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून, विशेष सशस्त्र दलाचे पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. पोलिस व जमावातील संघर्षानंतर केपे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, उपअधीक्षक उमेश गावकर, निरीक्षक रमेश गावकर सध्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

कुडचडे, दि. 4 (प्रतिनिधी) ः गेल्या महिन्यात तिळामळ केपे येथील चर्चच्या पाद्रीला काही स्थानिक ख्रिस्ती दुकानदारांनी मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा तिळामळ केपे येथील चर्चमध्ये दोन गटांत मारामारी झाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. त्याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याने पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही.देसाई यांच्यासह पाच पोलिस जखमी झाले. देसाई यांना मडगाव इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
केपे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिळामळ केपे येथील चर्चचे फेस्त सुरू असून, आज संध्याकाळी 6 च्या सुमारास दोन गटांत काही कारणांवरून भांडण झाले. याची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. देसाई फौजफाट्यासह घटनास्थळी रवाना झाले. तेथे गेल्यावर परिस्थिती काबूत आणताना त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. ते त्या दोघांना गाडीत बसवून पोलिस ठाण्यावर नेण्याच्या बेतात असतानाच, जमावाने त्यांच्याशी हुज्जत घातली व पोलिस वाहनाची चावी काढून घेतली. त्याचवेळी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या हल्ल्यात देसाई यांच्यासह पाच पोलिस जखमी झाले. पोलिस व्हॅनचेही मोठे नुकसान झाले. देसाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले.

No comments: