पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मद्यपान करून तुम्ही वाहन चालवत असाल, तर आता तुमची खैर नाही. कारण मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध सध्या सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहतूक कायद्याच्या कलम १८५ नुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३०० वाहन चालकांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यात रात्री पार्ट्यांना जाणारे तरुणांचा मोठा भरणा असल्याचे दिसून आले आहे. तसेच ट्रक चालक व पर्यटकांचाही समावेश त्यात आहे.
मद्यपि चालकाला १०० किंवा २०० रुपये पोलिसांच्या हातात देऊन आता सटकता येणार नाही. अशा प्रकरणात सापडलेल्या वाहन चालकालायापुढे प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यासमोर उभे केले जाणार आहे. तुमची जर ही पहिलीच वेळ असेल तर २ हजार रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवास किंवा, दोन्ही एकाचबरोबर शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. गेल्या तीन महिन्यात वाहतूक पोलिसांनी राज्यभरात २९५ मद्यपी वाहनचालकांवर अशी कारवाई करून त्यांची कागदपत्रे पुढील कारवाईसाठी प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर पाठवून दिली आहेत. या कलमाखाली शिक्षा झालेला चालक तीन वर्षांत पुन्हा मद्यपान करून वाहन चालवताना पोलिसांच्या हाती लागल्यास त्याला दोन वर्षे तुरुंगवास आणि ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच त्याचा वाहन परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.
दारू पिऊन वाहन चालवल्यानेच अपघातात वाढ होत असल्याचे गेल्या काही घटनेत पोलिसांच्या लक्षात आल्याने आधीपासून काहीशी संथगतीनेे सुरू असलेली ही मोहीम आता अधिक प्रमाणात तीव्र करण्याचे आदेश पोलिस खात्यातील सहा वाहतूक पोलिस केंद्रांना देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. त्याचप्रमाणे वाहन चालकाने किती प्रमाणात दारू घेतली याचेही मोजमाप करण्यासाठी "अल्कोमीटर' उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चालकाला खाली उतरवून त्याच्या तोंडात अल्कोमीटर देऊन फुंकर मारण्यास सांगितली जाते. चालकाने किती मद्यपान केले याचा तपशील अल्कोमीटरवर उमटतो. तो जर "३०एमजी' पेक्षा जास्त असेल तर संबंधितावर कारवाई होऊ शकते.
एका "बीअर'नेदेखील "३० एमजी'पेक्षा जास्त अशी नोंद होऊ शकते. त्यामुळे दारू पिऊन रात्री किंवा दिवसा बेफाम वाहने हाकणाऱ्या मंडळींना लगाम बसू शकेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
खास करून रात्री वाहने चालवणाऱ्या चालकांची अल्कोमीटरद्वारे चाचणी केली जाणार आहे.
Saturday, 10 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment