मडगाव, दि. ९(प्रतिनिधी): कर्नाटकातून गोव्यात विवाह समारंभासाठी आलेल्या एका कुटुंबावर आज दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळली. दुपारी त्यांच्यापैकी एक गट कोलवा समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन बोटीतून जलसफरीसाठी गेला होता. त्याचवेळी ही बोट उलटून नऊ जण पाण्यात पडले. त्यातील सयमुल्ला खतीब (४०) हा बुडून मरण पावला, तर इस्माईल हरपल्ली देवगरी हा जखमी झाला. त्याला हॉस्पिसियो इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. इतर आठ जणांना वाचवण्यात आले आहे.
गृहनिर्माण वसाहत घोगळ येथील इस्लाम साब यांच्याकडे हावेरी कर्नाटक येथील त्यांचे नातेवाईक विवाह समारंभासाठी आले होते. ते कोलवा येथे बोटीने जलसफर करण्यासाठी गेले असता बोट भर समुद्रात उलटली व त्यातील नऊ जण पाण्यात पडले. किनाऱ्यावरील रक्षकांनी उड्या मारून सर्वांना पाण्याबाहेर काढले. त्यातील सयमुल्ला खतीब व इस्माईल यांची प्रकृती गंभीर बनली होती. हॉस्पिटलात नेत असता सयमुल्ला खतीब याचे निधन झाले. कोलवा पोलिस या घटनेची चौकशी करीत आहे.
Friday, 9 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment