श्रीपाद नाईक यांचा आरोप
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): राज्यातील सामान्य जनता वाढत्या महागाईच्या चटक्यांनी पोळून निघत असताना त्यावर उपाय आखण्याचे सोडून कुंभकर्णासारखी झोप घेणारे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केला.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष प्रा. सुभाष साळकर व प्रवक्ते तथा सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
जनतेच्या प्रश्नांची अजिबात पर्वा नसलेल्या मुर्दाड सरकारचा निषेध करून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपने महागाईविरोधात उभारलेल्या आंदोलनाला जनतेने भरीव प्रतिसाद दिला. अकराही तालुक्यांत महागाईविरोधी आंदोलन महिला मोर्चाच्या सहकार्याने पार पाडले. १४ ठिकाणी तेल, नारळ व कांदा अशा जीवनावश्यक वस्तूंची स्वस्त दरात विक्री केली. ठाम निश्चय केल्यास महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, हे या आंदोलनाव्दारे भाजपने दाखवून दिले, परंतु जनतेशी देणेघेणे नसलेल्या सरकारने त्यापासून कसलाच बोध घेतला नाही. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने गेंड्याची कातडी पांघरली असून जनतेला महागाईच्या अग्निकुंडात ढकलणाऱ्या या सरकारची गंभीर दखल जनता नक्कीच घेईल, असा विश्वासही श्री. नाईक यांनी बोलून दाखवला.
कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोपही श्री. नाईक यांनी केला. पोलिसांवरील लोकांचा विश्वास पूर्ण ढासळल्याने आता जनता पोलिसांवरच हल्ला करू लागली आहे. हा गंभीर विषय असल्याचे ते म्हणाले. तिळामळ केपे येथील संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला करण्याची कृती चिंताजनक आहे. त्यामुळे जनता व पोलिस यांच्यातील दरी रूदांवत चालल्याची खंत श्री. नाईक यांनी व्यक्त केली.
पाण्यासाठी वणवण
राज्यात पाणी व वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. उकाड्याने लोक हैराण झालेले असताना नळ कोरडे पडले आहेत. वीजटंचाईमुळे लोकांना जगणे कठीण बनले आहे. राज्यातील प्रमुख शहरी भागांत सध्याच पाणीटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे लोकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. प्राथमिक गरजांपासूनही लोकांना वंचित ठेवणाऱ्या या सरकारने विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे श्री. नाईक म्हणाले.
Monday, 5 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
instead of only speaking on such matters, the leaders of bjp should go for concrete steps
mahesh
Post a Comment