दहा वॉटर बोटींचे परवाने रद्द
सततच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई
पणजी, दि. 7 (प्रतिनिधी) - कळंगुट किनाऱ्यावर जेथे पर्यटक आंघोळीसाठी उतरतात त्या ठिकाणीच "जेट स्की व वॉॅटर स्पोर्ट बोट' चालवणाऱ्या दहा बोटींचे परवाने आज कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पर्यटन खात्याने संयुक्तपणे केलेल्या कारवाईअंतर्गत रद्द केले.
या जेट स्की व वॉटर स्पोर्ट बोटींविरोधात पर्यटन खात्याकडे गेल्या काही महिन्यांपासून अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे वेळोवेळी या बोट मालकांना इशारा देण्यात आला होता. काल सकाळी कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पर्यटन खाते तसेच पर्यटक पोलिस तेथे दाखल झाले असता, पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी या बोटी वावरत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आज सकाळी सहा बोटींचे परवाने रद्द केल्याचा आदेश काढण्यात आल्याचे कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन ए. पी. मास्कारेन्हस यांनी सांगितले.
समुद्रात पर्यटन खात्याने या बोटवाल्यांना जागा आखून दिली आहे. मात्र तेथे न थांबता गर्दीच्या ठिकाणीच या बोटी चालवल्या जात होत्या. बोटीतून जलसफर करणाऱ्या पर्यटकांना काही पैसे आकारून या बोटीतून फिरवले जात असे. परवाना असलेल्या सुमारे 150 जेट स्की व वॉटर स्पोर्ट बोटी या व्यवसायात आहेत.
पर्यटकांना त्रास होईल असा प्रकारे या बोटी चालवण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे मास्कारेन्हस यांनी सांगितले. तसेच पर्यटकांना इजा पोचेल, असे कोणतेच कृत्य खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यापूर्वी वॉटर स्पोर्टस् बोटला बांधलेल्या पॅराशूटने हवाई सफर करणारी पर्यटक महिला अनेक फुटावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती.
बेकायदा सनबेड व शॅक्सप्रकरणी न्यायालयाने पर्यटन खात्यावर कडक ताशेरे ओढल्याने आता बोटींचा विषय पर्यटन खात्याने गांभीर्याने घेतला आहे. पर्यटक पोलिसांनीही या बोटींमुळे समुद्रात अपघात होण्याची शक्यता असल्याची सूचना पर्यटन खात्याला केली होती. तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन खात्याकडे या बोटींच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या.
नियम मोडणाऱ्या बोटींविरोधात कारवाई मोहीम अशीच सुरू ठेवली जाणार असल्याचे कॅप्टन मास्कारेन्हस यांनी सांगितले.
Thursday, 8 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment